वांगी (जिल्हा सांगली) – कडेगाव तालुक्यातील वांगी येथील अशोकराव शंकरराव निकम यांच्या घराच्या समोर आणि मागील द्वारास विद्युत् वाहक तारेचा उच्च दाबाचा ११ ‘के.व्ही.’चा ‘शॉक’ देऊन संपूर्ण कुटुंब संपवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. ही विद्युत् वाहक तार द्वाराला जोडल्याने अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत् वितरण आस्थापनाची वांगी आणि तडसर गावांची वीज बंद पडल्यामुळे निकम यांचे संपूर्ण कुटुंब वाचले. अशोकराव हे स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचे मोठे सुपुत्र आहेत.
१. अशोकराव शंकरराव निकम हे ३ ऑक्टोबरला रात्री पत्नी आणि २ मुलांसह भोजन करून झोपी गेले. रात्री १ वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला आणि घरातील वीज गेली. घराजवळ ‘रोहित्र’ असल्यामुळे त्यात बिघाड झाल्याने काहीतरी झाले असेल, असा विचार करून त्यांनी दुर्लक्ष केले.
२. दुसर्यांदा वीज आल्यानंतर परत घरालगत जाळ झाल्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना जागे केले. विजेरीच्या साहाय्याने बाहेर पाहिल्यावर त्यांना वीजवाहक तार घराच्या दोन्ही द्वारांना लावलेली आढळून आली.
३. या कालावधीत काही लोक तेथे मोठमोठ्याने बोलत असल्याचे आणि बाहेर असलेल्या पिकाचा लाभ घेऊन धावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रात्री अंधार असल्याने हे लोक कोण होते ? ते कळू शकले नाही.
४. मध्यरात्रीनंतर अशोकराव निकम यांचे पुत्र सूरज निकम यांनी या संदर्भात चिंचणी-वांगी पोलिसांना कळवले.