महिला उपनिरीक्षकासह ९ पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन !

पुणे येथे रुग्‍णालयातून आरोपीच्‍या पलायनाचे प्रकरण !

पुणे – ससून रुग्‍णालयाच्‍या परिसरात ‘मॅफेड्रीन’ अमली पदार्थ सापडला. त्‍यानंतर आरोपी ललित पाटील याने रुग्‍णालयातून पलायन केले. या दोन्‍ही प्रकरणांत कर्तव्‍यात हलगर्जीपणा केल्‍याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकासह ९ पोलीस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्‍यात आले आहे. (संबंधित पोलिसांचे केवळ निलंबन न करता या प्रकरणाची व्‍याप्‍ती पहाता त्‍यांना बडतर्फ करणे आवश्‍यक आहे. – संपादक) पोलीस आयुक्‍त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली. ललित पाटील याला रुग्‍णालयात १ ऑक्‍टोबरला रात्री ८ वाजता ‘एक्‍स रे’ (क्ष किरण तपासणी) काढण्‍यास नेतांना त्‍याने पलायन केले होते.

चाकण येथील अमली पदार्थ तस्‍करीच्‍या गुन्‍ह्यात आरोपी ललित पाटील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. उपचारासाठी त्‍याला रुग्‍णालयात आणल्‍यावर तो रुग्‍णालयातून अमली पदार्थ तस्‍करी करत होता. गुन्‍हे शाखेने १ ऑक्‍टोबर या दिवशी ससून रुग्‍णालयाच्‍या परिसरातून २ कोटी रुपयांचे ‘मॅफेड्रीन’ जप्‍त केले होते. या प्रकरणी पाटील याच्‍यासह तिघांविरुद्ध गुन्‍हा नोंद केला होता.

संपादकीय भूमिका

अटकेतील आरोपी अमली पदार्थांची तस्‍करी करतो, याला कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक नसणेच कारणीभूत !