राज्यातील मुसलमानांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
पणजी, २ ऑक्टोबर (वार्ता.) : धार्मिक भावना दुखावल्यावर मोर्चा काढू नका, सरकार नक्की कारवाई करील यावर विश्वास ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील विविध मशिदींचे प्रमुख आणि भाजपचे नेते उर्फान मुल्ला यांना केले. नुकतीच सामाजिक माध्यमांतून इस्लामच्या विरोधात माहिती प्रसारित केल्याच्या प्रकरणी राज्यभरात मुसलमानांनी आंदोलन करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मशिदींचे प्रमुख आणि भाजपचे नेते उर्फान मुल्ला यांनी २ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आवाहन केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘सामाजिक माध्यमात इस्लामच्या विरोधात माहिती प्रसारित करणार्या वाळपई येथील मुलाला कह्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही माहिती २ बनावट ‘आयडी’वरून लिहिण्यात आलेली आहे.
यासंबंधी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमाशी संपर्क करण्यात आला आहे आणि याविषयी अन्वेषणासाठी ८ जणांचा गट नेमण्यात आला आहे. ‘इन्स्टाग्राम’ खात्यासंबंधी तपशील मिळण्यासाठी न्यूनतम ४ दिवसांचा कालावधी लागतो; मात्र ही माहिती निश्चितच मिळणार आहे. संबंधित व्यक्ती भारतात कुठेही असली, तरी तिला पकडून गोव्यात आणण्याचे दायित्व आमचे आहे आणि संबंधित व्यक्ती जर भारताबाहेरील असेल, तर ती व्यक्ती जेव्हा भारतात येईल, तेव्हा तिला कह्यात घेण्यात येईल. बहुतांश बनावट खाती ही विदेशात राहून केली जातात; मात्र प्रत्येक घटनेवरून गुन्हा नोंद होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणे, फादरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणे आणि इस्लामच्या विरोधात माहिती प्रसारित करणे या सर्वही प्रकरणांत सरकारने कठोरतेने कारवाई केली आहे. २ धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये.’’