‘तुम्ही भारताला क्षणभर विसरू शकता; पण ज्या प्रकारे आतंकवादी शक्ती कॅनडात डोके वर काढत आहेत, ती केवळ भारतासाठीच नाही, तर कॅनडासाठीही धोक्याची आहे’, अशी माहिती देशाचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी १७ सप्टेंबर या दिवशी ‘जी-२०’ परिषद संपल्यानंतर दिली. मल्याळम् वृत्तवाहिनी ‘एशियानेट’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. जयशंकर ज्या धोक्याविषयी बोलत होते, त्या धोक्याचा सामना कॅनडाने ३८ वर्षांपूर्वी केला होता. खरे तर ज्या खलिस्तानी आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारताशी संघर्ष करत आहेत, त्याच खलिस्तानी आतंकवाद्यांवर २६८ कॅनेडियन नागरिकांची हत्या केल्याचा आरोप आहे. या लेखात खलिस्तानी आतंकवाद्यांनी ‘एअर इंडिया’चे ‘विमान (फ्लाइट) १८२’मधील ३२९ निरपराध लोकांना कसे मारले होते ? याविषयीची माहिती देत आहोत.
१. कॅनडातील मनजित सिंगने ‘एअर इंडिया’च्या विमानात स्वतःची बॅग ठेवणे
कॅनडातील व्हँकुव्हरहून टोरंटोला जाण्यासाठी मनजित सिंग नावाची व्यक्ती २२ जून १९८५ या दिवशी दुपारी ३.३० वाजता विमानतळावर सामान पडताळून आत जातेे. तिकीट खात्रीपूर्वक नसल्याचे कळल्यावर मनजित विमानतळावरील उपस्थित दलाला विनंती करतो. तो म्हणतो, ‘मी नाही, तर किमान माझे सामान टोरंटोहून भारताच्या ‘फ्लाइट १८२’वर (‘कनिष्क’वर) पाठवले पाहिजे.’ दलाल प्रारंभी टाळाटाळ करतो; पण लोकांच्या गर्दीमुळे मनजीत सिंगची विनंती मान्य करतो. यानंतर सिंग पायाने ढकलून सुटकेस पडताळतो; मात्र हे करत असतांना त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही आणि तो हवे ते करण्यात सहज यशस्वी होतो. अशा प्रकारे त्याचे सामान व्हँकुव्हर ते टोरंटोच्या विमानामध्ये ठेवण्यात येते.
२. मनजित सिंगच्या बॅगची कुणीही पडताळणी न करणे
सिंग विमानात नसला, तरी त्याची सुटकेस विमानातच होती. हे विमान रात्री ८.२२ वाजता टोरंटोला पोचले. यानंतर प्रवासी आणि सामान टोरंटोहून भारतात येणार्या ‘एअर इंडिया’च्या कनिष्क विमानात हलवले जाते. हे विमान टोरंटोहून लंडनमार्गे भारतात जाणार होते. व्हँकुव्हरनंतर टोरंटो विमानतळावरही मनजितच्या सामानाची पडताळणी करण्यात आली नाही. ते थेट भारतात जाणार्या कनिष्क विमानात ठेवण्यात आले. सामान हलवतांना ‘फ्लाइट अटेंडंट्स’ने (विमान परिचरने) ही सुटकेस कोणत्या प्रवाशाची आहे ? तो विमानात आहे कि नाही ? याकडेही लक्ष दिले नाही.
३. ‘एअर इंडिया’च्या ‘कनिष्क’ विमानाचा स्फोट होणे
२३ जून १९८५ या दिवशी दुपारी १२.२५ वाजता ‘एअर इंडिया’चे ‘कनिष्क’ टोरंटोहून उड्डाण करते आणि या विमानामध्ये ३०७ प्रवासी आणि २२ ‘क्रू मेंबर्स’ (विमानात काम करणारे कर्मचारी) होते. हे विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळापासून ४५ मिनिटांच्या अंतरावर असतांना सकाळी ८.१६ वाजता अचानक रडारवरून गायब झाले. नियंत्रण कक्षाने त्याच मार्गावरून उड्डाण करणार्या अन्य दोन विमानांशी संपर्क साधून एअर इंडियाच्या विमानाचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना विचारले गेले, ‘एअर इंडिया’चे ‘फ्लाइट १८२’ कुठे दिसत आहे का ?’ दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी ‘नाही’, असे उत्तर दिले.
काही वेळाने ब्रिटीश मालवाहू (कार्गो) विमानाच्या पायलटने नियंत्रण कक्षाला संदेश पाठवला. हा संदेश मिळताच तिथे गोंधळ उडाला. वास्तविक कार्गो विमानाच्या पायलटने सांगितले की, त्याला अटलांटिक महासागरात ‘फ्लाइट १८२’चे अवशेष दिसले आहेत. चौकशीच्या वेळी आढळून आले की, विमान आयर्लंडच्या किनारपट्टीवर पोचताच मोठा स्फोट झाला. या वेळी हे विमान ३१ सहस्र फूट उंचीवर उडत होते. हा स्फोट इतका प्रचंड होता की, संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. विमानातील एकही प्रवासी वाचू शकला नाही.
४. खलिस्तानी आतंकवाद्यांकडून जगातील सर्वांत मोठे आतंकवादी आक्रमण !
बचाव पथकाला केवळ १८१ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृत्यूमुखी पडलेल्या ३२९ जणांपैकी २६८ भारतीय वंशाचे कॅनडाचे नागरिक होते. एअर इंडिया ‘फ्लाइट १८२’चा स्फोट हे जगातील सर्वांत मोठे आतंकवादी आक्रमण होते. कॅनडातून कार्यरत असलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांवर निरपराध लोकांच्या मृत्यूचा आरोप होता.
५. खलिस्तानवाद्यांचा आणखी एका भारतीय विमानात स्फोट करण्याचा प्रयत्न अयशस्वी !
‘कनिष्क’ विमानात झालेल्या स्फोटानंतर काही मिनिटांतच जपानमधील टोकियो येथील नारिता विमानतळावरही मोठा स्फोट झाला. खलिस्तानी आतंकवाद्यांनी टोकियोमार्गे मुंबईला जाणारे एअर इंडियाचे दुसरे विमान उडवून देण्याची योजना आखली होती. त्यासाठी कॅनडाहून निघालेल्या विमानात चतुराईने बाँब ठेवला. येथेही कॅनडातून टोकियोला पोचलेल्या विमानातील सामान भारतात जाणार्या एअर इंडियाच्या ‘फ्लाइट ३०१’मध्ये स्थलांतरित केले जात असतांना विमानतळावरच हा स्फोट झाला. माल उचलणारे २ कर्मचारी जागीच ठार झाले. अशा प्रकारे एअर इंडियाचे दुसरे विमान उडवण्याचा खलिस्तानवाद्यांचा कट फसला.
६. बाँबस्फोट प्रकरणी २ खलिस्तानवाद्यांना अटक; पण पुराव्याअभावी त्यांची सुटका !
या घटनेच्या चौकशीसाठी भारत सरकारने स्वतंत्र समितीही स्थापन केली होती. माजी न्यायाधीश बी.एम्. कृपाल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीच्या अहवालात म्हटले आहे की, एअर इंडियाचे ‘फ्लाइट १८२’ हे विमान आतंकवादी आक्रमणात नष्ट झाले. इंजिनमध्ये बिघाड झाला नाही. ‘बब्बर खालसा’चा आंतरराष्ट्रीय नेता तलविंदर सिंग परमार हा या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले.
सर्व काही उघडपणे घडत होते, तरीही कॅनडाच्या सरकारने कारवाई केली नाही. ८ नोव्हेंबर १९८५ या दिवशी ‘रॉयल कॅनेडियन माऊंटेड’ पोलीस आणि ‘इंटेलिजन्स सर्व्हिस’ने (गुप्तचर यंत्रणेने) ‘एअर इंडिया बाँबस्फोट’ प्रकरणात ‘बब्बर खालसा’ आंतरराष्ट्रीय संघटनेचा प्रमुख तलविंदर सिंग परमार याच्या घरावर धाड टाकून त्याला अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी इंद्रजित सिंग रयत जो व्यवसायाने ‘मेकॅनिक’ (यंत्रज्ञ) होता, त्याला इंग्लंडमधून फेब्रुवारी १९८८ मध्ये अटक करण्यात आली. रयतवर टोकियो विमानतळावर झालेल्या स्फोटात बाँब बनवल्याचा आरोप होता. अन्वेषणात असे आढळून आले की, बाँब रेडिओमध्ये ठेवण्यात आला होता. तो रेडिओ रयतने डंकन येथील त्याच्या घराजवळ खरेदी केला होता.
या घटनेत दोघांचा हात असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या; पण पुराव्याअभावी त्या दोघांची सुटका करण्यात आली. केवळ रयतला तत्कालीन २ सहस्र डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आणि तोही अन्य काही गोष्टींसाठी ! यानंतर रयत इंग्लंडमध्ये स्थायिक झाला.
७. कॅनडाच्या गुप्तहेर विभागाचा दायित्वशून्यपणा !
अ. एअर इंडियाच्या बाँबस्फोटाच्या या दुःखद घटनेपूर्वीही कॅनडाचे गुप्तहेर खाते परमार आणि इंद्रजित सिंग यांच्यावर लक्ष ठेवून होते. २३ जूनच्या घटनेपूर्वी म्हणजे ४ जून या दिवशी कॅनडाच्या गुप्तहेर खात्याने दोघांना व्हँकुव्हर बेटावरील जंगलात जातांना पाहिले होते. त्यांच्या अहवालानुसार त्यांनी तेथे स्फोटाची चाचणी केली होती. तथापि गुप्तहेर विभागाने ‘ही बंदुकीच्या गोळीची चाचणी आहे’, असे मानले आणि त्याची माहिती पोलिसांना दिली नाही. या घटनेत परमार यांचे नाव समोर आल्यानंतर गुप्तहेर विभागाने सांगितले होते की, त्यांच्यावर कारवाई करू नका.
कॅनडातून सुटका झाल्यानंतर तलविंदर सिंग परमार पाकिस्तानात गेला. तो वर्ष १९९२ मध्ये भारतात आला. मुंबई येथे पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झाला. ‘सीबीसी न्यूज’नुसार परमार मृत्यूपूर्वी पोलिसांच्या कह्यात होता. तेथे एअर इंडियाच्या बाँबस्फोटाविषयी त्याची चौकशी करण्यात आली होती.
आ. कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने मान्य केले की, त्यांनी या प्रकरणाशी संबंधित लोकांचे १५० घंट्यांचे ‘कॉल रेकॉर्ड’ (ध्वनीमुद्रित केलेले संपर्क) हटवले आहेत की, जे ते न्यायालयात पुरावे म्हणून वापरले जाऊ शकत होते. ‘नोंदी खोडल्या नाहीत, तर माहिती देणार्यांना धोका होऊ शकतो’, असे संस्थेच्या कर्मचार्याने सांगितले.
८. खलिस्तानी आतंकवाद्यांकडून एअर इंडिया विमानावर आक्रमण करण्याची उघड उघड चेतावणी !
या नियोजित आक्रमणाच्या पूर्वीच कॅनडातील अनेक गुरुद्वारांतून ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात होत्या. ‘बब्बर खालसा’ संघटना उघडपणे एअर इंडियामध्ये प्रवास न करण्याची चेतावणी देत होती. असे असूनही कॅनडाच्या सुरक्षायंत्रणांना याचा शोधही लावता आला नाही. एवढेच नाही, तर या घटनेपूर्वी परमार याने खलिस्तानींच्या बैठकीत ‘एअर इंडियाची विमाने आकाशातून खाली पडतील’, असे म्हटले होते. याची माहिती असूनही परमार याच्यावर घटनेपूर्वी आणि त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अशी चेतावणी देत असतांनाही कॅनडाचे पोलीस त्याकडे मूकपणे पहात राहिले.
९. एअर इंडिया बाँबस्फोट प्रकरणातील साक्षीदाराची हत्या आणि खटल्यासाठीचा व्यय
२२ जानेवारी १९८६ या दिवशी कॅनडाच्या ‘एव्हिएशन सेफ्टी बोर्डा’नेही ‘एअर इंडिया फ्लाइट १८२’ मध्ये झालेला स्फोट हा एक कट होता’, हे मान्य केले. एअर इंडियाच्या बाँबस्फोटाच्या अन्वेषणासाठी कॅनडामध्ये स्वतंत्र न्यायालय कक्ष बांधला होता.
वर्ष १९९५ मध्ये कॅनडातील सरे येथे रहाणारे एका वृत्तपत्राचे संपादक तारा सिंग हेयर यांनी कॅनडाच्या पोलिसांना सांगितले की, बागरी नावाच्या एका व्यक्तीने बाँबस्फोटांमध्ये स्वतःचा सहभाग असल्याचे मान्य करतांना ऐकले. यानंतर एअर इंडिया बाँबस्फोटात तिसर्या आरोपीचे नाव सांगितले गेले; पण कॅनडाच्या पोलिसांच्या प्रयत्नानंतरही या प्रकरणातील साक्षीदार तारा सिंग हेयर यांना पुरेशी सुरक्षा मिळाली नाही आणि वर्ष १९९८ मध्ये त्यांची हत्या झाली.
हा खटला कॅनडात इतका उच्च वर्गातील होता की, त्याला ‘एअर इंडिया ट्रायल’ असे नाव देण्यात आले. खटल्याची नाजूकता लक्षात घेऊन ७.२ दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच ५९ कोटी ८६ लाख रुपये व्यय करून स्वतंत्र न्यायालय कक्ष सिद्ध करण्यात आला. यामध्ये २० न्यायाधिशांना सुनावणीसाठी नेमण्यात आले होते.
१०. चौकशी समितीचा कॅनडा सरकार, पोलीस आणि गुप्तचर विभाग यांवर ठपका अन् सरकारची तोंडदेखली क्षमायाचना !
वर्ष २००० मध्ये एअर इंडिया बाँबस्फोट प्रकरणात कॅनडाच्या पोलिसांनी रिपुदमन सिंग नावाच्या व्यावसायिकाला आणि गिरणीत काम करणार्या अजयब सिंग बागरी याला अटक केली होती. त्यांच्यावर ‘फर्स्ट डिग्री’ हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. तथापि वर्ष २००५ मध्ये कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ई.एन्. जोसेफन् यांनी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे नाहीत. ‘एफ्.बी.आय.’ (फेडरेल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’) च्या माहितीदात्याने सांगितले होते की, घटनेच्या काही दिवसांनंतर बागरी याने बाँबस्फोटाचे कृत्य केले होते.
वर्ष २००६ मध्ये कॅनडा सरकारने एअर इंडिया बाँबस्फोटाची सार्वजनिक चौकशी समिती घोषित केली. कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जॉन सी. मेयर याचे नेतृत्व करत होते. त्यांनी वर्ष २०१० मध्ये ३ सहस्र २०० पानांचा अहवाल प्रसिद्ध केला. यासाठी त्यांनी सरकार आणि सुरक्षायंत्रणा यांना उत्तरदायी धरले. ते म्हणतात, ‘सरकारने मृतांच्या कुटुंबियांना शत्रूंसारखे वागवले. तलविंदर सिंग परमार हा संपूर्ण बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.’
चौकशी समितीच्या अहवालात या घटनेसाठी कॅनडातील सुरक्षायंत्रणेतील त्रुटींना उत्तरदायी धरण्यात आले होते. या घटनेची चौकशी करणार्या कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जॉन मेयर यांनी वर्ष २०१० मध्ये सांगितले, ‘कॅनडाच्या सरकारने दायित्व घेण्याची आवश्यकता आहे.’ जॉन मेयर यांनी विमानाच्या अपघातासाठी कॅनडा सरकार, ‘रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलीस’ आणि ‘कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस’ (कॅनडाचे गुप्तचर विभाग) यांना उत्तरदायी धरले. चौकशीनंतर वर्ष २०१० मध्ये कॅनडा सरकारने पीडितांची औपचारिक क्षमा मागितली. या प्रकरणातील आरोपी रिपुदमन सिंग याची वर्ष २०२२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
(साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’चे संकेतस्थळ, २२.९.२०२३)
संपादकीय भूमिकासरकारने कणखर राहून ठोस पावले उचलल्यासच खलिस्तानवाद्यांच्या विध्वंसक कारवायांना प्रतिबंध बसेल ! |