आजपासून चालू होत असलेल्या ‘पितृपक्षा’च्या निमित्ताने…
‘श्राद्ध पक्षाचे दिवस हे ऋषि आणि आई-वडील यांच्याप्रती श्रद्धा अन् कृतज्ञता व्यक्त करण्याचे, तसेच अनाहत चक्र विकसित करून अंतरीची सुरक्षा करण्याचे दिवस आहेत.
१. तुम्ही जसे द्याल, तसे तुम्हाला मिळेल !
आपल्या भौतिक कल्याणासाठी आई-वडिलांनी रक्ताचे पाणी केले. आध्यात्मिक उत्थानासाठी ऋषींनी देह झिजवला, रक्ताचे पाणी केले, जीवनाच्या सुख-सुविधा सोडून एकांतात अरण्यात राहिले. अशा महापुरुषांनी आपल्या उत्थानासाठी नाना प्रकार केले. त्यांनी तुमच्यासाठी पुष्कळ काही केले आहे. तुम्ही सुद्धा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेला स्थूल रूपात दाखवण्याचे जे दिवस आहेत, ते ‘श्राद्धाचे दिवस’ म्हटले जातात. तुम्ही जे देता, ते मिळवता. तुम्ही श्राद्ध करता, पितरांना देता, ऋषींचे तर्पण करता, तर त्या मोबदल्यात तुम्हालाही त्यांचा आशीर्वाद मिळतो. श्राद्ध केल्याने तुमच्या धनाचे सामाजिकीकरण होते आणि तुमचा वेळ कृतज्ञतेत सत्कारणी लागतो.
२. श्राद्धाच्या दिवशी पुढील गोष्टींची काळजी घ्या !
अ. श्राद्धाच्या दिवशी श्राद्धकर्त्याने तेल लावणे वर्ज्य आहे.
आ. त्या दिवशी अशा कोणत्याही मोठ्या माणसाला घरी बोलावू नये; ज्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्याच्याकडे लक्ष द्याल, तर ज्यांचे श्राद्ध करता त्यांचा अपमान होतो.
इ. अश्रू ढाळत श्राद्ध केले, तर ते प्रेतांना जाऊन मिळते; म्हणून रडत, अश्रू ढाळत श्राद्ध करू नये.
३. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणाला भोजन देण्यामागील कारण
‘तुम्ही खीर अगर भोजन बनवले, तरी ते तुम्ही १० ब्राह्मणांनाच खाऊ घालावे’, असा नियम नाही. व्यसनमुक्त, परोपकारी, सदाचारी आणि सज्जन असेल, अशा १ किंवा २ ब्राह्मणांना खाऊ घातले, तरी चालते. ब्राह्मण आणि स्वयंपाक करणारा शुद्धी अन् पवित्रतेची काळजी घेणारा (सुयोग्य) असावा. त्या वेळी वातावरण जितके पवित्र, तितके त्या श्राद्धाचे मूल्य अधिक मिळते. श्राद्धाचे भोजन करणार्या ब्राह्मणाने भोजन करतांना मौनात रहावे. तो बोलत राहिला, तर प्राणशक्ती, मनःशक्ती क्षीण होईल.
तुम्ही धन, भूमी अथवा बाह्यसूचना यांच्या तथाकथित ज्ञानाने कुणाला संतुष्ट करू शकत नाही. कुणाला ५० – १०० रुपये द्याल, तर तो म्हणेल, ‘ठीक आहे, पुष्कळ आहेत’; पण आत मागणी आहे. तुम्ही २-४ गुंठे भूमी दान केली, तर म्हणेल, ‘ठीक आहे.’ दुसरेही घेण्याची त्याच्याकडे योग्यता आहे, तो आतून पूर्ण तृप्त नाही. एक भोजनच असे आहे की, तुम्ही खाऊ घालाल, तर माणूस आतून आणि बाहेरून तृप्त होतो. तुम्ही आदर आणि श्रद्धेचा व्यवहार कराल, तर ब्राह्मणाच्या द्वारे भगवंत तुमच्यावर संतुष्ट होतील.
४. काहीही नसेल, तर पुढीलप्रमाणे श्राद्ध करावे !
तुमच्या घरी दारिद्य्र असेल, खाण्या-पिण्याच्या वस्तू नसतील, तर तुम्ही नदीकाठी अथवा नळाखाली स्नान करून ओंजळीत जल घेऊन त्यात थोडेसे काळे तीळ टाका. काळे तीळ नसतील, तर असेच त्या पितरांचे स्मरण करून पाण्याने तर्पण करा. तुमच्यात प्रेम आणि श्रद्धा असेल, तर त्यानेही ते तृप्त होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २०२०)