हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर बिस्किटाच्या श्री गणेशमूर्तीचे प्रदर्शन काढले !
पुणे, २८ सप्टेंबर (वार्ता.) – येथील सुप्रसिद्ध ‘ग्राहक पेठ’ यांच्या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्सवानिमित्त देखावा आयोजित करण्यात येतो. मागील वर्षी त्यांच्याकडून बिस्किटांपासून बनवलेल्या हत्तीवर मूर्ती ठेवण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी बिस्किटांपासून बनवलेल्या मूर्तीचे छायाचित्रही तेथे ठेवण्यात आले होते. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांनी ‘ग्राहक पेठ’चे अध्यक्ष श्री. सूर्यकांत पाठक यांची भेट घेऊन त्यांना धर्मशास्त्र सांगितले आणि श्री गणेशमूर्तीच्या होणार्या अवमानाविषयी त्यांचे प्रबोधन केले होते. त्यानंतर यावर्षी देखाव्यात पालट करत ‘ग्राहक पेठ’ने चॉकलेट, बिस्कीट यांचा वापर करून मूर्ती अथवा तिचे छायाचित्र न ठेवता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील ‘मार्सेलिसची उडी’ हा प्रसंग साकारला. ‘ग्राहक पेठ’चे अध्यक्ष श्री. सूर्यकांत पाठक याविषयी सांगतांना म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीने सांगितल्यामुळे आम्हाला अध्यात्मशास्त्रानुसार मूर्ती कशी असावी ? मूर्तीची आरास कशी असावी ? हे लक्षात आले अन् अनवधानाने होणारी विटंबना रोखता आली. (स्वत:च्या कृतीत पालट करून धर्मशास्त्रानुसार कृती केल्याविषयी ‘ग्राहक पेठ’चे अभिनंदन ! अन्य मंडळे, दुकानदार आणि गणेशभक्त यांनी ‘ग्राहक पेठ’चा आदर्श घेऊन धर्मशास्त्रानुसार कृतींचा अवलंब करावा ! – संपादक)
देखाव्यात बिस्किटे आणि चॉकलेट यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेला ‘मार्सेलिसची उडी’ हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील प्रसंग गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होता. ‘देखावा चांगला असून अशा देखाव्यांच्या माध्यमातून नागरिक, तसेच युवा पिढीमध्ये राष्ट्र-धर्माविषयी जागृती होते’, असे देखावा पहाणार्या गणेशभक्तांनी सांगितले.