कोल्हापूर : जिल्हाधिकार्‍यांनी शेतकरी संघाची इमारत बळजोरीने कह्यात घेतली !

आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकरी संघासमवेत कोणतीही चर्चा केली नाही, तर अचानकपणे संघाची जागा कह्यात देण्याविषयी नोटीस पाठवली. यानंतर दुसर्‍याच दिवशी बळजोरीने जागा कह्यात घेतली. या संदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघ बुधवार, २७ सप्टेंबर या दिवशी संघाच्या मुख्य कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती शेतकरी संघाच्या अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 (सौजन्य : SP9 Marathi)

या प्रसंगी सदस्य अजितसिंह मोहिते म्हणाले, ‘‘संघाची जागा बळजोरीने कह्यात घेऊन कोल्हापूरचे नाक कापण्याचे काम केले जात आहे. ‘बैल’ बसला आहे; म्हणून त्याला कुणी चुकीच्या पद्धतीने डिवचण्याचे काम करू नये. जिल्ह्यात संघाचे ४० सहस्र सभासद आहेत आणि २ लाख मतदार आहेत. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत धडा शिकवल्याविना रहाणार नाहीत.’’

काय आहे प्रकरण !

‘नवरात्रोत्सवात दर्शन मंडप, हिरकणी कक्ष, प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र, स्वच्छतागृह, तसेच अन्य सुविधा भाविकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी भवानी मंडप येथील शेतकरी संघाचा तळमजला आणि पहिला मजला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कह्यात द्या’, अशी नोटीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, प्रकरण ११, अंतर्गत कलम ६५, पोटकलम (ब) अन्वये २३ सप्टेंबरला संघाला बजावली आणि २४ सप्टेंबरला ती कह्यातही घेतली. शेतकरी संघाने या निर्णयाला विरोध केला असून त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.

हे ही वाचा –

भाविकांच्‍या सुविधेसाठी शेतकरी संघाच्‍या इमारतीचे तात्‍पुरते अधिग्रहण !- राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी
https://sanatanprabhat.org/marathi/723061.html