भाषेचा सन्‍मान करणे यात विरोध करण्‍यासारखे काय होते ? – राज ठाकरे

राज ठाकरे

मुंबई – ज्‍या राज्‍याची जी भाषा आहे त्‍या भाषेत दुकाने, आस्‍थापने यांच्‍या नावाच्‍या पाट्या असायला हव्‍यात, इतका साधा नियम असतांना, त्‍याला विरोध करून काही मूठभर व्‍यापार्‍यांनी हा लढा न्‍यायालयात का नेला? महाराष्‍ट्रात असाल तर मराठीत अन्‍य राज्‍यांत असाल, तर तेथील भाषेत पाट्या असणे किंवा त्‍या ठिकाणी त्‍या भाषेचा सन्‍मान करणे यात विरोध करण्‍यासारखे काय होते ? तुम्‍ही जर व्‍यापारासाठी इथे महाराष्‍ट्रात येता, तर येथील भाषेचा सन्‍मान तुम्‍ही केलाच पाहिजे. माझ्‍या महाराष्‍ट्र सैनिकांनी यासाठी संघर्ष केला. आता सर्वोच्‍च न्‍यायालयानेही काही मूठभर व्‍यापार्‍यांना चपराक दिली आहे. महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक दुकानावर आणि आस्‍थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्‍हणजे हवी. हे पहाणे आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासन यांचे काम आहे, असे ट्‍वीट मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज्‍यात मराठी पाट्या लावणे बंधनकारक राहील,या न्‍यायालयाच्‍या सुनावणीनंतर ठाकरे यांनी वरील भाष्‍य केले.

मराठीसाठी यापुढेही सतर्क रहा !

दुकानांवर मराठी पाट्या असाव्‍यात यासाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने मागील कित्‍येक वर्षे जो संघर्ष केला त्‍याला या निर्णयाने मान्‍यता मिळाली. मराठी पाट्यांविषयी जागृती माझ्‍या महाराष्‍ट्र सैनिकांमुळे आली. त्‍यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन आहे. तुम्‍ही सतर्क राहिलात, तसेच यापुढेही सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन या वेळी राज ठाकरे यांनी केले.