सैन्यदलांच्या अग्नीवीर भरती योजनेत मोठे पालट होण्याची शक्यता !

५० टक्के सैनिक ४ वर्षांनंतर होऊ शकतात कायम !

नवी देहली – भारत शासनाने गेल्या वर्षी सशस्त्र दलांत भरती होण्यासाठी ‘अग्नीवीर’ नावाची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला तेव्हा मोठा विरोध झाला होता. या विरोधाला झुगारून सरकारने ही योजना लागू केली. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या तुकडीला भरती होऊन आता एक वर्ष झाले असून या योजनेत महत्त्वपूर्ण पालट केले जात आहेत, अशी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. ‘यांतर्गत या योजनेतून भरती झालेल्या तरुणांपैकी ५० टक्के तरुणांना कायम केले जाईल’, असे बोलले जात आहे. मूळ योजनेनुसार ही टक्केवारी केवळ २५ होती. तसेच उर्वरित ७५ टक्के तरुणांना एक विशिष्ट रक्कम देऊन निवृत्ती दिली जाणार होती. जर हा पालट कार्यान्वित झालाच, तर ५० टक्के तरुणांना कायम केले जाईल, तर उर्वरित ५० टक्क्यांना निवृत्ती दिली जाणार आहे.

१. ही योजना नौदल, हवाईदल आणि भूदल या तीनही दलांसाठी असून यासंदर्भात सरकारने सध्या अधिकृतपणे काहीही घोषित केलेले नाही. तरी यासंदर्भात संरक्षण विभागातील अधिकार्‍यांची पहिली बैठक झाली असल्याची माहिती आहे.

२. नौदल आणि हवाईदल यांमध्ये बहुतेक सैनिक हे तांत्रिक काम करत असतात. सैन्यातही सैनिकांना अनेक विभागांत तांत्रिक कामे करावी लागतात. त्यामुळे ५० टक्के भरती झालेल्या सैनिकांना कायमस्वरूपी करण्याच्या विचारात सरकार आहे.

३. पहिली तुकडी भरती होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे सरकार लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे.