सातारा, २४ सप्टेंबर (वार्ता.) – पाचव्या दिवशी श्री गणेशमूर्तींचे गौरींसह विसर्जन झाले. गौरी-गणपति विसर्जनासाठी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते; मात्र घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यात करण्याकडे भाविकांचा कल होता.
सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरातील घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ठिकठिकाणी विसर्जन कुंड ठेवले होते, तसेच या विसर्जन कुंडामध्येच भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहनही पालिकेच्या वतीने केले होते. सातारा जिल्ह्यातून अनेक नद्या प्रवाहित होतात. यामध्ये सातारा शहर परिसरात कृष्णा, वेण्णा आणि उरमोडी नदी यांचा समावेश आहे. दोन दिवसांच्या झालेल्या पावसामुळे नद्यांनाही पाणी उपलब्ध झाले होते. त्यामुळे भाविकांनी विसर्जन कुंडामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करता वहात्या पाण्यात करण्यास प्राधान्य दिले. गौरी-गणपति विसर्जनासाठी नदीकाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी प्रबोधन !घरगुती गणपतींचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संगम माहुली येथील नदीकाठी भाविकांचे प्रबोधन करण्यात येत होते. या प्रबोधनामुळे अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केले. |