‘सत्संगात एकदा एका साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांना पुढील प्रश्न विचारला, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये एकदा तुमचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात आपण लिहिले होते, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना प्रथम रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होणार आहे. त्यानंतर गोव्यात आणि नंतर अन्य राज्यांमध्ये होईल.’ रामनाथी आश्रमात सेवा करतांना आम्हा साधकांकडून काहीना काही त्रुटी होतात. त्यामुळे ‘येथे हिंदु राष्ट्र आहे’, असे मला वाटत नाही; परंतु बाहेरगावाहून आश्रमात आलेल्या पाहुण्यांना ‘या आश्रमात हिंदु राष्ट्र आहे’, असे वाटते. याविषयी योग्य विचार कसा असायला हवा ?’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘तुम्ही हिंदु राष्ट्राचा विचार मन आणि बुद्धी या स्तरांवर करत आहात. बाहेरील पाहुणे या आश्रमाची आध्यात्मिक स्तरावर आनंदाची अनुभूती घेतात. त्या पाहुण्यांची आध्यात्मिक पातळी अधिक आहे.’’
या प्रसंगी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘त्रेतायुगात प्रभु श्रीरामाचे रामराज्य होते. तेव्हा लोकांकडून काहीना काही त्रुटी होतच असतील; परंतु ते सतत प्रभु श्रीरामाच्या स्मरणात राहून रामाला अनुभवून आनंदी जीवन जगत होते. त्याप्रमाणे रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु आणि संत यांचे अस्तित्व आहे. त्यामुळे आश्रमाची वास्तू चैतन्यमय झाली आहे. येथे रहाणारे साधक परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या स्मरणात राहून साधनेतील आनंद घेत आहेत. ‘आश्रमातील ईश्वरी आनंद अनुभवणे’, म्हणजे हिंदु राष्ट्र अनुभवण्यासारखेच आहे.’
(ही हिंदु राष्ट्राची व्यष्टी अनुभूती झाली. ही अनुभूती समष्टी स्तरावरही सर्वांनाच यायला हवी, यादृष्टीने सनातनच्या सर्व आश्रमांतील साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. – परात्पर गुरु डॉ. आठवले )
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.