१. मंदिराचे सुव्यवस्थापन करण्याच्या निमित्ताने राज्य सरकारांकडून हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण
‘भारताच्या प्रत्येक लहानमोठ्या खेडेगावात एक तरी मंदिर असतेच. तमिळनाडूमधील प्रत्येक खेडेगावात किमान २ मंदिरे असतात. त्यांपैकी एक शिवाचे आणि दुसरे महाविष्णु अथवा देवीचे असते. पूर्वी या मंदिरांची व्यवस्था तेथील स्थानिक लोकच पहात असत. गावातील प्रत्येक व्यक्तीकडे मंदिराचे काही ना काही दायित्व असे. काही जण मंदिरासाठी दानधर्म करत, तर काही जण प्रत्यक्ष सेवा आणि काही जण दोन्ही करत असत. तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि भारतातील इतर राज्यांमध्ये राज्य सरकारांनी मंदिरांचे नियंत्रण अन् व्यवस्थापन स्थानिक लोकांकडून काढून घेतले. हे अत्यंत नियोजनपूर्वक करण्यात आले. जसे ‘ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी’ने कर वसूल करण्याच्या निमित्ताने भारतात प्रवेश मिळवला आणि नंतर सत्ता हस्तगत करून येथे राज्य केले, तसे ‘आम्ही मंदिरांचे चांगले व्यवस्थापन करू’, असे म्हणत सरकारने आपल्या मंदिरांमध्ये प्रवेश मिळवला आणि तेथील कारभार हातात घेतला.
२. नेहरूंकडून मंदिरांना अविकसित ठेवण्याचा प्रयत्न
गेल्या दोन पिढ्यांपासून आपल्या हातात मंदिरांचे व्यवस्थापन नाही, हे सत्य आहे. आपण आपले वडील आणि आजोबा यांना विचारायला हवे, ‘त्यांनी असे का घडू दिले ?’ ‘शासन मंदिरांचा विकास करील’, या विचारानेच त्यांनी मंदिरे शासनाच्या हातात सोपवली असणार; पण ‘मंदिरांना विकसित होऊ न देणे’ या नेहरूप्रणित धोरणाचा हा एक भाग आहे’, हे त्यांच्या लक्षात आले नाही. या धोरणामुळे मंदिरांचा अविभाज्य भाग असलेल्या नैतिक मूल्यांपासून हिंदु समाज दूर लोटला गेला. कालांतराने मंदिरे आणि हिंदु समाज यांच्यातील दरी वाढतच गेली.
३. हिंदूंच्या मनात मंदिरांचे स्थान
पूर्वी मंदिरे धार्मिक संस्था होत्या. हिंदूंसाठी मंदिरे ही केवळ पूजा करण्यासाठी, सहजतेने ईश्वराची उपासना करण्यासाठी किंवा अन्य पंथांप्रमाणे सार्वजनिक कार्यक्रमासाठी निर्माण केलेली सभागृहे नव्हती, तर ती एक धर्मव्यवस्था होती आणि समाजाला एकसंध ठेवण्याची मुख्य भूमिका बजावत होती. हिंदु समाजातील प्रत्येक घटक; मग तो ब्राह्मण असो किंवा तथाकथित दलित येथे एकत्र येत असत. हे सर्वजण मंदिरासाठी एकत्रितपणे स्वतःला नेमून दिलेले कार्य करत असत. मंदिरात केवळ मूल्यशिक्षण नव्हे, तर अन्य शिक्षणही दिले जाई. मंदिरामधूनच आर्थिक विकास भरभराटीने झाला; कारण हे कार्य मंदिर व्यवस्थापनाकडून नियमानुसार आणि न्याय्य पद्धतीने होत असे. शासनाने हिंदूंची मंदिरे कह्यात घेतल्यामुळे हळूहळू मंदिरे आणि वैदिक संस्कृती नष्ट झाली. हिंदु समाजाचे स्वयंस्फूर्तीने मंदिरांतील विविध उपक्रमांत सहभागी होणे बंद झाले. लोक मंदिराचे कार्य कोणतेही मूल्य न घेता आणि कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता सेवा म्हणून करत असत, ते संपुष्टात आले. ‘मूल्य घेऊन आणि लाभाची अपेक्षा ठेवून केलेल्या कार्याला सेवा’ म्हणता येत नाही. लोकांना मंदिरांविषयी वाटणारी श्रद्धा न्यून व्हावी; म्हणून लोकांच्या सेवाभावी वृत्तीचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले.
४. मराठ्यांकडून तमिळनाडू आणि ओडिशा राज्यांमधील हिंदूंचे रक्षण
उत्तर भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांमुळे तेथील समाजाला पुष्कळ त्रास सहन करावा लागला. दक्षिण भारतातही परकीय आक्रमणे झाली; पण येथील लोकांनी त्याविरुद्ध लढा दिला. त्याचे श्रेय विजयनगरचे सम्राट आणि मराठा राज्यकर्ते यांना आहे. बहुतांश लोकांना हे ठाऊकच नाही की, मराठ्यांनीच तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांमध्ये हिंदु धर्माचे रक्षण केले. मराठ्यांनी रामेश्वर आणि जगन्नाथ पुरीच्या मंदिराचे रक्षण केले अन् या राज्यांतील लोकांना अहिंदू होण्यापासून वाचवले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण ऋणी आहोत’, हे विसरून चालणार नाही; मात्र सध्या शाळेत शिकवल्या जाणार्या इतिहासात याचा उल्लेख केला जात नाही. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र’ येणे आवश्यक आहे.
५. मंदिरांच्या सरकारीकरणामुळे सनातन धर्माची अपरिमित हानी
मंदिरांमुळे टिकून असणारी सनातन व्यवस्थाही कमकुवत करण्यात आली. मंदिरांचा कारभार चालवण्यासाठी धन मिळवून देणार्या व्यवस्था कह्यात घेतल्या गेल्या. धर्माला अर्थाचे पाठबळ असणे आवश्यक असते. हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ४ पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी अर्थाचे दायित्व गृहस्थाचे आहे. गृहस्थाने स्वतःकडे असलेले धन अर्पण करून संन्यासी, ब्रह्मचारी आणि इतर समाज यांना साहाय्य करणे, हे त्याचे कर्तव्य आहे. गृहस्थाश्रमी पुरुष आणि त्याची पत्नी यांनी समाजातील संन्यासी, वानप्रस्थाश्रम स्वीकारलेले वयोवृद्ध अन् गुरुकुलात शिक्षण घेणारे ब्रह्मचारी यांची काळजी घेणे अपेक्षित आहे.
‘अर्थाविना धर्मकारण करता येत नाही’, या नियमानुसार धर्माला असलेले अर्थाचे पाठबळ काढून घेण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात आले. मंदिरांशी निगडीत असलेल्या वेदपाठशाळा, आयुर्वेद शाळा, गोशाळा आणि नंदनवने बंद करण्यात आली. त्यासमवेतच मंदिराशी संबंधित कला, चित्रकला, नृत्ये, शिल्पे हळूहळू नष्ट होऊ लागली. या प्रक्रियेत ब्राह्मणांचे स्थान नष्ट झाले आणि त्यांनी गावे सोडून शहराचा रस्ता धरला. तेथे त्यांनी सैन्य, अधिकोष आदींमध्ये चाकरी धरली अथवा मिळतील, ती कामे करायला आरंभ केला. जीर्णोद्धाराच्या नावाखाली मंदिरांचा सांस्कृतिक वारसा नष्ट करण्यात आला आणि मंदिरे पालटण्यात आली. मंदिरांतील मूर्ती लूटण्यात आल्या. मंदिरांना केवळ व्यापारीकरणाची स्थाने बनवण्यात आली. सध्या जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, तेव्हा तेथे तुम्हाला ‘मॉल (वाहनांची रहदारी नसलेले मोठे बंदिस्त खरेदी क्षेत्र)’ पेक्षाही अधिक धनाचा व्यवहार होतांना दिसेल. हे सर्व मंदिरांच्या सरकारीकरणामुळे घडले. या व्यावसायिकीकरणामुळे हिंदु समाजाची नीतीमूल्ये हरवली आणि तो शक्तीहीन झाला, तसेच हिंदूंची मंदिराविषयी असणारी निष्ठा नष्ट करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती धर्मांतराला पोषक बनली.
६. तमिळनाडूमध्ये सरकार नियंत्रित मंदिराकडून प्रतिवर्षी एका धर्मद्रोही नेत्याच्या वाढदिवसावर उधळपट्टी
यापूर्वी हे केरळ राज्यात घडले आणि आता तमिळनाडूत होत आहे. सरकारने धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्यास प्रारंभ केल्यामुळे आपल्या ४ व्यवस्था कमकुवत झाल्या. सरकारने ‘देवाचे अभिषेक आणि पूजा कधी करायची ?’, याचे निर्णय घेण्यास आरंभ केला. यावर कदाचित् विश्वास बसणार नाही; पण एक वास्तव सांगतो. तमिळनाडूमध्ये अण्णादुराई हे कट्टर नास्तिक आणि हिंदुविरोधी मुख्यमंत्री होऊन गेले. प्रतिवर्षी ३ फेब्रुवारीला सक्तीने त्यांच्या नावाने मंदिरात अन्नदान करून त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. ज्या व्यक्तीने आयुष्यभर हिंदूंवर टीका केली, हिंदूंच्या देवतांचा अपमान केला, रामायण आणि इतर धार्मिक ग्रंथांची टवाळी करून हे ग्रंथ जाळण्याची मागणी केली, अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या नावाने हिंदु मंदिरात अन्नदान करून तिला मानसन्मान दिला जातो. हे सर्व मंदिरांवर सरकारचे नियंत्रण असल्यामुळेच घडत आहे. (क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. रमेश टी.आर्., अध्यक्ष, ‘टेंपल वर्शिपर्स सोसायटी’, चेन्नई, तमिळनाडू.