कॅनडातील खलिस्तानवादी मानसिकतेच्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भारताने पावले उचलावीत !
कॅनडास्थित खलिस्तानी समर्थक असणारा गायक शुभनीत सिंह याचे भारतात विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, तशीच त्याची खलिस्तानी मानसिकता लक्षात घेता त्याचे हे कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत. काही मासांपूर्वी त्याने भारताचे विकृत मानचित्र (नकाशा) प्रसारित केले होते. त्यात काश्मीर, पंजाब आणि ईशान्येतील राज्ये दाखवलेली नव्हती. पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादी अमृतपाल सिंह याला अटक केल्यानंतर त्याच कालावधीत हे मानचित्र प्रसारित केले होते. त्यामुळे त्याच्या हेतूविषयी अनेकांनी शंका उपस्थित केली.
भारतातील त्याचे कार्यक्रम रहित केल्यानंतर काहींनी अशा प्रकारे लावलेल्या निर्बंधांवर नेहमीप्रमाणे टीका केली आहे. ए.पी. धिल्लन हा कॅनडास्थित गायक. तोही पंजाबी. त्याने लोकांना फुकाचा सल्ला देत ‘आपण तिरस्काराऐवजी प्रेम पसरवायला हवे’, अशी पोस्ट प्रसारित केली आहे. धिल्लन याने इंस्टाग्रामवर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’वरून कुणावरही टीका केलेली नाही; मात्र त्याने शुभनीत याची एक प्रकारे तळी उचलली आहे. कॅनडात बसून स्वतःच्या घातक कृतींनी फुटीरतावादी चळवळीला खतपाणी घालणार्या शुभनीत याच्यासारख्या गायकाला भारतियांनी डोक्यावर का घ्यावे ? अशा कार्यक्रमांतून मिळणारा पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरणार नाही कशावरून ? धिल्लन याच्यासारख्या कॅनडास्थित गायकाने शुभनीत याच्यावर टीका करणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता त्याची पाठराखण करण्याचे कुकृत्य त्याने केले आहे. धिल्लन म्हणतो त्याप्रमाणे तिरस्कार आणि त्यामुळे समाजात निर्माण होणारी कटुता कुणाला हवी असते ? ‘सर्वत्र शांती आणि एकोपा रहावा’, असेच सर्वांना वाटते; मात्र शुभनीत सिंह याच्यासारख्या खलिस्तानी समर्थकांच्या मनात वेगळेच कट शिजत असतात. अशांसाठी गायन किंवा कला हे लोकांच्या मनोरंजनाचे नव्हे, तर त्यांच्यात फुटीरतेची बिजे पेरण्याचे माध्यम बनवून त्याद्वारे लोकांमध्ये घातक मनोवृत्ती निर्माण करायची असते. आजची तरुण पिढीही डोळ्यांवर झापडे बांधून या कलाकारांना स्वतःचा आदर्श मानते.
शुभनीत सिंह याचे भारतातील कार्यक्रम रहित झाल्यानंतर त्याने ‘भारत माझाही देश आहे’, असे म्हटले आहे. शुभनीत जर भारताला स्वतःचा देश मानत असता, तर त्याने देशाचे विकृत मानचित्र प्रसारित केले नसते. त्यामुळे शुभनीत याने दिलेल्या स्पष्टीकरणाचा आता काहीही उपयोग नाही. भारतावर कोणत्याही माध्यमांतून कुरघोडी करण्यात येत असेल, तर ती करणार्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतील, हे जगाला दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. त्या दृष्टीने शुभनीत याचा कार्यक्रम रहित झाला, हेही एक प्रकारे चांगलेच झाले. ही सर्व सूत्रे पहाता शुभनीत सिंह याच्यासारख्या गायकाची ‘अशुभ’ पावले भारतात पडू नयेत, यासाठी सरकारने काळजी घ्यावी, असेच भारतियांना वाटते.
एकात्मतेची प्रतिमा !
मध्यप्रदेशातील खांडवा येथील ओंकारेश्वर च्या ओंकार पर्वतावर आद्य शंकराचार्य यांच्या १०८ फूट उंच “एकात्मतेची प्रतिमा” पुतळ्याचे अनावरण करण्यात आले . सरकारने दुरदृष्टिने हा पुतळा उभारला आहे. ओंकारेश्वरला आद्य शंकराचार्य यांच्या आयुष्यात महत्वाचे स्थान होते, येथेच त्यांना त्यांचे गुरु गोविंद भगवत्पाद भेटले. त्यांच्या आश्रमात राहून त्यांनी ४ वर्षे अध्ययन केले होते. त्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी आद्यशंकराचार्य यांनी ओंकारेश्वर येथून अखंड भारतामध्ये वेदांच्या प्रचारासाठी प्रस्थान केले. आद्यशंकराचार्य यांचे जीवन आणि त्यांनी केलेले अद़्भुत कार्य यांना अभिवादन करण्यासाठी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. ‘हिंदु धर्मात जातीव्यवस्था आहे’, ‘हिंदु धर्म मागास आहे’, ‘या धर्मात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते’, अशा आशयाची विधाने करून हिंदु धर्माला संपवण्याचे कारस्थान रचले जात आहे. हिंदूंचा बुद्धीभेद करून त्यांच्या मनात धर्माविषयी न्यूनगंड निर्माण करण्याचा कट रचला जात आहे. या संकटावर मात करण्यासाठी आद्यशंकराचार्यांची शिकवण अंगीकारणे, ही काळाची आवश्यकता आहे. आद्यशंकराचार्य जेव्हा भारतभ्रमणावर निघाले, तेव्हा देशातील परिस्थितीही अशीच होती. धर्माला ग्लानी आली होती. त्यामुळे धर्माच्या नावावर अनेक अपप्रकार करणार्यांचे स्तोम माजले होते. वैदिक तत्त्वज्ञानावर प्रश्न उपस्थित केले जात होते. अशा वेळी आद्यशंकराचार्यांनी शास्त्रार्थ सभांमध्ये जाऊन अनेकांशी वादविवाद करून त्यांना पराभूत केले. असे करून त्यांनी वैदिक तत्त्वज्ञान पुनरुज्जीवित केले. ‘हिंदु धर्मावर अशा प्रकारचे आघात होतच रहाणार’, हे त्यांनी जाणले होते. यासाठी त्यांच्या अनुयायांमध्ये ‘दंडी स्वामी’ असा गट केला. असे करून त्यांनी हिंदूंना शास्त्र शिकवण्याची व्यवस्था केली, तसेच त्यांनी नागा साधूंचे सैन्यही उभारले.
हिंदु धर्मावर वैचारिक आणि शारीरिक स्तरांवर आघात झाले. बळाचा वापर करून होणारे आघात परतवून लावण्यासाठी दूरदृष्टी ठेवून त्यांनी शस्त्रपूजा आणि शास्त्रपूजा अशा दोन्ही गोष्टींना महत्त्व दिले. हिंदु धर्मावर अनेक प्रकारे वैचारिक आघात केले जात आहेत. कुणी ‘सनातन धर्म आणि हिंदु धर्म वेगळे आहेत’, ‘हिंदू आणि हिंदुत्व वेगळे’, असे सांगून हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण करतो. अशा प्रकारे वैचारिक स्तरांवरील आघात झाल्यावर किती हिंदूंना त्याचा प्रतिवाद करता येतो ? हिंदूंना धर्माविषयी ज्ञान देणारी केंद्रे उपलब्ध नाहीत. निधर्मी शिक्षणव्यवस्था असल्यामुळे शाळांमधूनही हिंदूंना ते दिले जात नाही. त्यामुळे कुणी वैचारिक आघात केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यास हिंदू अल्प पडतात. आद्यशंकराचार्यांनी पाखंड्यांचे खंडण केल्यामुळे ते हिंदूंचे आदर्श आहेत. त्यामुळे आद्यशंकराचार्य यांचा पुतळा उभाराच; मात्र त्यासह त्यांनी शास्त्रपूजेचे केलेले व्यापक कार्य लक्षात देऊन हिंदु धर्माची महती सांगणारा स्रोतही निर्माण करण्याचे दायित्व सरकारने घ्यावे, असेच हिंदूंना वाटते. यामुळे धर्मावर आघात करणार्यांचा वैचारिक प्रतिवाद करणार्यांचा मोठा गट निर्माण होऊन, ते आघात रोखण्यास साहाय्य होईल.