कॅनडाकडून भारतावर हत्येचा आरोप करत उच्चाधिकार्‍याला देश सोडण्याचा आदेश !

कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचे प्रकरण

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या सरे शहरात जून मासामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंग निज्जर याच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाने भारताचा हात असल्याचा आरोप करत भारतीय उच्चायुक्तांना ५ दिवसांत देश सोडण्याचा आदेश दिला. भारताचा या हत्येशी संबंध असल्याचा थेट आरोपच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत केला. ते म्हणाले, ‘‘कॅनडाचे नागरिक हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येशी भारत सरकारच्या उच्चाधिकार्‍यांचा काही संबंध आहे का ? यासंदर्भात गेल्या काही आठवड्यांपासून कॅनडाच्या अन्वेषण यंत्रणा सखोल अन्वेषण करत होत्या.’’ निज्जर याच्यावर एका गुरुद्वाराच्या वाहनतळामध्ये २ तरुणांनी निज्जरवर गोळ्या झाडल्या. यात त्याचा मृत्यू झाला होता.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या प्रकरणाच्या संदर्भात थोडक्यात निवेदन केल्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मलेनी जॉली यांनी या कारवाईची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, कोणत्याही प्रकारचा विदेशी हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही. यावर आम्ही ठाम आहोत. यासंदर्भात आम्ही भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी भारताकडून पूर्ण सहकार्‍याची आम्हाला अपेक्षा असल्याचेही आम्ही त्यांना कळवले आहे. परिणामी आम्ही कॅनडामधून एका वरिष्ठ भारतीय उच्चाधिकार्‍याला निलंबित केले आहे.

भारताचे कॅनडाला जशास तसे प्रत्युत्तर देत उच्चायुक्तांची हकालपट्टी !

कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांच्या हकालपट्टीनंतर भारताने ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देत भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरून मॅकेई यांना बोलावण्यात आले होते. भारतात असलेल्या कॅनडाच्या एका वरिष्ठ मुत्सद्याची हकालपट्टी करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाची त्यांना माहिती देण्यात आली. संबंधित उच्चाधिकार्‍याला पुढच्या ५ दिवसांत भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमधील सहभाग यांमुळे आम्ही ही कारवाई करत आहोत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले की, भारत कॅनडाने केलेल्या आरोपांचे खंडन करतो. आम्ही कॅनडाचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांचे त्यांच्या संसदेतील निवेदन पाहिले. याच प्रकारचे आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोलून दाखवले होते; मात्र तेव्हाही आम्ही ते पूर्णपणे फेटाळले होते. आम्ही एक लोकशाही राष्ट्र असून कायद्याचा आदर राखण्यास बांधील आहोत. कॅनडात आश्रयास असणार्‍या खलिस्तानी आतंकवादी आणि कट्टरतावादी यांच्या सूत्रावरून लक्ष भरकटवण्याचा हा प्रयत्न आहे. हे खलिस्तानी भारताचे सार्वभौमत्व आणि सामाजिक एकोपा यांना थेट आव्हान देत आहेत. या प्रकरणी कॅनडा सरकारकडून कारवाई न होणेे, हे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित सूत्र आहे. कॅनडातील राजकीय व्यक्तींनी खलिस्तानी व्यक्तींविषयी उघडपणे सहभावना व्यक्त केल्या आहेत. ही काळजीची गोष्ट आहे. कॅनडामध्ये अशा अवैध गोष्टी, हत्या, मानवी तस्करी यांसारख्या गुन्हेगारी गोष्टींना थारा मिळणे, ही गोष्ट नवीन नाही. आम्ही कॅनडा सरकारला विनंती करतो की, त्यांनी कॅनडात चालू असणार्‍या अशा सर्व प्रकारच्या भारतविरोधी कारवायांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी.

भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावर अमेरिकेची प्रतिक्रिया

खलिस्तानी समर्थक निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणावरून भारत आणि कनॅडा यांच्यातील वादावर अमेरिकेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते अ‍ॅड्रिन वॉटसन म्हणाले की, पंतप्रधान ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांविषयी आम्ही अत्यंत चिंतित आहोत. आम्ही आमच्या कॅनडाच्या सहकार्‍यांच्या नियमित संपर्कात रहातो. कॅनडाने अन्वेषण करून दोषींना शिक्षा करणेे अत्यावश्यक आहे.

ट्रुडो यांना ‘जी-२०’ परिषदेत महत्त्व न मिळाल्याचा राग !

देहलीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी झालेल्या जी-२० परिषदेच्या बैठकीसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात आले होते. तेव्हा त्यांना अन्य देशांच्या प्रमुखांच्या तुलनेत अल्प महत्त्व दिल्याची टीका कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी कली होती. तसेच ‘ट्रुडो या परिषदेत त्यांचा ठसा उमटवू शकले नाहीत’, असाही आरोप करण्यात आला होता. ट्रुडो यांच्या भेटीत भारताचे पंतप्रधान मोदी यांनी कॅनडातील खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ट्रुडो म्हणाले होते की, आम्ही निरपराध्यांवर कारवाई करू शकत नाही.

यानंतर ट्रुडो कॅनडाला परत जाण्यापूर्वी त्यांचे विमान बिघडल्याने त्यांना २ दिवस भारतातच थांबावे लागले होते. यावरूनही ट्रुडो यांच्यावर त्यांच्या देशात टीका झाली होती. या सर्व घटनांचा परिणाम म्हणून ट्रुडो यांनी भारताच्या विरोधात कृती केल्याचे म्हटले जात आहे.

संपादकीय भूमिका 

कॅनडामध्ये गेल्या काही दशकांपासून खलिस्तानी आतंकवाद्यांचे शीख समर्थक रहात असून ते पंजाबमधील खलिस्तान्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करत आहेत. पंजाबमध्ये कारवाया करून खलिस्तानी आतंकवादी कॅनडामध्ये पळून जातात, हे नवीन राहिलेले नाही. अशा वेळी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांचे समर्थन करणार्‍या कॅनडाची ही कृती म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखेच होत !