पालकमंत्री लोढा यांच्या निर्देशांनुसार महापालिका शाळांमध्ये ‘रात्र अभ्यासिका’ चालू !

महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या ४ लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ !

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई – बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका चालू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची कार्यवाही विभागाने चालू केली असून, त्या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील ‘नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल’ येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या अंतर्गत रात्र अभ्यासिका चालू करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या ४ लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणे अपेक्षित आहे, असे लोढा यांनी सांगितले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ८ सप्टेंबर या दिवशी ‘नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल’ येथे या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले. उद्घाटनाच्या प्रसंगी आमदार पराग आळवणी, माजी नगरसेवक अभिजित सावंत आणि संबंधित अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना पालकमंत्री लोढा म्हणाले की,

१. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात ३५० ‘रात्र अभ्यासिका’ चालू व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रथम रात्र अभ्यासिका चालू झाली असून, यापुढे प्रत्येक वॉर्डमध्ये तशी सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.

२. महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या, तसेच परिसरातील खासगी शाळेत शिक्षण घेणार्‍या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रवेश घेता येणार आहे. ‘उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळा’च्या सहकार्याने पालिकेच्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध असेल अशा इमारतीतच सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत रात्र अभ्यासिका चालू करण्यात येणार आहे.