पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) यांना ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच श्रीकृष्‍ण आहेत’, याविषयी आलेली अनुभूती !

आज ६ सप्‍टेंबर या दिवशी ‘श्रीकृष्‍ण जयंती’ आहे. त्‍या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेच्‍या १० व्‍या अध्‍यायातील १२ व्‍या आणि १३ व्‍या श्‍लोकांत देवता आणि ऋषिमुनी यांनी केलेले श्रीकृष्‍णाचे वर्णन वाचून भावजागृती होणे

‘२९.७.२०२३ या दिवशी पहाटे ५.३० वाजता मी नेहमीप्रमाणे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आत्‍मनिवेदन केले. त्‍यानंतर मी श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेच्‍या १० व्‍या अध्‍यायातील १२ वा आणि १३ वा श्‍लोक वाचायला आरंभ केला. मला संस्‍कृत भाषा येत नसल्‍याने मी कन्‍नड अनुवाद वाचते. त्‍यात लिहिले आहे, ‘श्रीकृष्‍णाचा परम भक्‍त आणि मित्र असलेला अर्जुन श्रीकृष्‍णाला म्‍हणाला, ‘हे श्रीकृष्‍णा, तू परब्रह्म, परमधाम आणि परम पवित्र आहेस. सर्व ऋषी, दिव्‍य पुरुष, देवता तुला ‘आदिदेव, जन्‍मरहित आणि सर्वव्‍यापी’, असे म्‍हणतात. देवर्षि नारद, असित देवल ऋषि, महर्षि व्‍यास आणि स्‍वतः तूही मला हेच सांगतोस.’ हे वाचतांना माझी पुष्‍कळ भावजागृती झाली.

२. भगवद़्‍गीता वाचून श्रीकृष्‍णाला समजून घेण्‍याचा प्रयत्न करणे

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

माझ्‍या मनात आले, ‘हे अर्जुना, तू किती भाग्‍यवान आहेस ! इतक्‍या लहान वयात तू प्रत्‍यक्ष भगवंताच्‍या मुखातून इतके आध्‍यात्मिक ज्ञान प्राप्‍त केलेस. माझे आयुष्‍य संपत आले असूनही मी अजून अज्ञानीच राहिले आहे. हे श्रीकृष्‍णा, महर्षि व्‍यासांनी लिहिलेल्‍या ‘महाभारत’ या महाकाव्‍यात तू अर्जुनाला सांगितलेली भगवद़्‍गीता वाचून मी तुला समजून घेण्‍याचा थोडासा प्रयत्न करत आहे.’

३. श्रीकृष्‍णाचे वर्णन वाचून भावजागृती होत असतांना अकस्‍मात् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र प्रकाशमान दिसून सुगंध येेणे

गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आत्‍मनिवेदन करतांना मी नेहमी श्रीराम, श्रीकृष्‍ण, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची भावचित्रे माझ्‍यासमोर ठेवून बसते. २९.७.२०२३ या दिवशी मी श्रीकृष्‍णाचे वर्णन वाचत असतांना अकस्‍मात् मला ‘माझे गुरु सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे भावचित्र प्रकाशमान झाले असून स्‍थुलातून चमकत आहे’, असे  दिसलेे. त्‍याच वेळी मला तीव्र सुगंधही आला. तो सुगंध क्षणभरच आल्‍यामुळे ‘तो माझा भ्रम असावा’, असे मला वाटले; परंतु त्‍यानंतर ८ वाजता अल्‍पाहारासाठी जातांना ‘माझ्‍या हातातील रुमालाला तोच सुगंध येत आहे’, असे माझ्‍या लक्षात आले. तेव्‍हा मला पुष्‍कळ आनंद झाला. माझ्‍या या आनंदात मी सर्व साधकांना सहभागी करून घेतले.

४. कृतज्ञता आणि प्रार्थना 

‘हे गुरुदेव, ही अनुभूती देऊन तुम्‍ही मला ‘श्रीकृष्‍ण आणि तुम्‍ही एकच आहात’, याची जाणीव करून दिली’, यासाठी मी तुमच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते. ‘मला अशा अनेक अनुभूती द्याव्‍यात’, अशी तुमच्‍या चरणी अनंत कोटी कृतज्ञतेसह प्रार्थना करते.’

– (पू.) श्रीमती राधा प्रभु (सनातनच्‍या ४४ व्‍या (समष्‍टी) संत), मंगळुरू, कर्नाटक. (२९.७.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.