पारंपरिक वाद्ये वाजवणार्‍यांवर गुन्हे नोंद : गणेशोत्सव मंडळांमध्ये असंतोष !

कारवाईचे तारतम्य ठेवून गुन्हे मागे घेण्याची सरकारकडे मागणी !

मुंबई, ५ सप्टेंबर (वार्ता.) – वर्ष २०२२ मधील गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये वाजवल्याच्या प्रकरणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी याविषयी असंतोष व्यक्त करत हे गुन्हे मागे घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत ‘गणेशोत्सवाच्या कालावधीत पारंपरिक वाद्ये वाजवल्याच्या प्रकरणी नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत’, अशी मागणी सर्व मंडळांनी एकत्रितपणे केली. बैठकीत ‘अखिल सार्वजनिक उत्सव समिती’चे अध्यक्ष हितेंद्र जाधव यांनी गणेशोत्सव मंडळांच्या विविध मागण्यांचे निवेदन सरकारला सादर केले.

पोलिसांनी तारतम्याने कारवाई करावी ! – हितेंद्र जाधव, अध्यक्ष, अखिल सार्वजनिक उत्सव समिती

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत अनेक मंडळे एकत्र असतात. मंडळांच्या वाद्यांच्या आवाजाने एकत्रित मोजमाप केले जाते. यामध्ये आजूबाजूच्या गाड्यांचे ‘हॉर्न’ आणि गोंगाट यांचाही समावेश आहे. गणेशोत्सव मंडळे कायद्याचे उल्लंघन करत नाहीत. गणेशोत्सवाच्या कालावधीत एकीकडे सरकार काही दिवस ध्वनीक्षेपकाचे नियम शिथिल करते आणि दुसर्‍या बाजूला त्याच दिवशीअशा प्रकारचे गुन्हे नोंदवते. ‘आवाज फाऊंडेशन’च्या दबावाला बळी पडून पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे. ‘कारवाई करतांना तारतम्य बाळगायला हवे’, अशी प्रतिक्रिया अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेंद्र जाधव यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

पोलिसांकडून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

हे गुन्हे पोलिसांकडून नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांना ध्वनीक्षेपणाचे मोजमाप करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावर्षीच्या धोरणाविषयी सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. गुन्हे मागे घेण्याविषयीचा निर्णय गृहविभागाला घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

वर्षभर मशिदींवर वाजणार्‍या भोंग्यांकडे दुर्लक्ष आणि वर्षातून एकदा येणार्‍या हिंदूंच्या सणांच्या वेळी मात्र कारवाई, हा पोलीस अन् प्रशासन यांच्याकडून केला जाणारा दुजाभावच होय. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे !