‘प्रज्ञान’ रोव्हरचे काम इस्रोकडून बंद !

२२ सप्टेंबरनंतर रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची आशा !

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘चंद्रयान-३’च्या प्रज्ञान रोव्हरने त्याला दिलेले काम पूर्ण केले आहे. आता त्याला सुरक्षितपणे ‘पार्क’ (एका ठिकाणी उभे करणे) करण्यात आले आहे आणि त्याचा ‘स्लीप मोड’ (बंद करण्याची प्रक्रिया) सक्रीय करण्यात आला आहे. त्याची उपकरणेही बंद करण्यात आली आहेत. या उपकरणांमधील माहिती ‘विक्रम’ लँडरच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवण्यात आली आहे. सध्या बॅटरी पूर्ण भारित (चार्ज) आहे. पुढील सुर्योदय २२ सप्टेंबर २०२३ या दिवशी होणार आहे. त्या वेळी सूर्यप्रकाश पडेल, अशी सोलर पॅनलची रचना करण्यात आली आहे, अशी माहिती इस्रोने दिली. चंद्रयानचे विक्रम लँडर २३ ऑगस्ट या दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते आणि त्याच्या २ घंटे २६ मिनिटांनी त्यातून ‘प्रज्ञान’ रोव्हर बाहेर आले होते. चंद्रावर त्या दिवसापासून पुढील १४ दिवस सूर्यप्रकाश असणार होता. या काळात सौर ऊर्जेद्वारे ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ काम करणार होते. आता ४ सप्टेंबरला १४ दिवस पूर्ण होत असल्याने येथे अंधार होणार आहे. त्यामुळे इस्रोने प्रज्ञानला बंद केले आहे.

‘प्रज्ञान’ रोव्हर भारताचा चंद्रावरील राजदूत म्हणून कायम चंद्रावरच राहील !

इस्रोने पुढे म्हटले आहे की, २२ सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा रोव्हर नव्या कामासाठी यशस्वीपणे चालू होईल, अशी आम्हाला आशा आहे. हा ‘प्रज्ञान’ रोव्हर भारताचा चंद्रावरील राजदूत म्हणून कायम चंद्रावरच राहील.