पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे श्री गणेशमूर्ती विक्री दुकानांना परवाना नसल्यास उपायुक्तांची कारवाईची चेतावणी !

पिंपरी (जिल्हा पुणे) – श्री गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी दुकाने उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा व्यवसाय परवाना सक्तीचा आहे. व्यवसाय परवाना असल्याविना मूर्ती विक्री केल्यास कारवाईची चेतावणी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिली आहे.

उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले की, मूर्ती विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होते. त्यासाठी महापालिकेचा व्यवसाय परवाना असणे बंधनकारक असून त्यासाठी ४९९ रुपये शुल्क भरावे लागते. अर्जासह जागेचा नकाशा, १०० रुपयांच्या ‘स्टँप पेपर’वर प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पॅनकार्डची प्रत जोडावी लागते. व्यवसाय परवाना असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून स्टॉलसाठी मंडप टाकण्यास अनुमती दिली जाते. त्यासाठी वाहतूक पोलिसांचाही ‘ना हरकत’ दाखला जोडणे आवश्यक असते. आतापर्यंत महापालिकेकडे १९३ अर्ज आले आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याविना मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे.