अन्य पंथियांच्या विनाशकारी शिकवणीच्या तुलनेत सर्वव्यापी असणार्‍या हिंदु धर्माची वैशिष्ट्ये !

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी

भाग ७

१. हिंदु धर्माची वैशिष्ट्ये

हिंदुत्व ही एक ‘जगण्याची पद्धत’ असल्यामुळे ही पद्धत जगातील सर्व मानवजातीला सारखीच लागू पडते. या पद्धतीचा स्वीकार केवळ हिंदु धर्मियांनीच केला पाहिजे, असे नाही. हिंदूंची जीवनपद्धत आणि जीवनमूल्ये ही सर्वांसाठीच कल्याणकारी आहेत. या हिंदु धर्माचा कुणी एक संस्थापक नाही आणि एकच कोणता ग्रंथ नाही. अनेक ऋषिमुनी, संत-सत्पुरुष, थोर पुरुष यांच्या अनेक वर्षांच्या सखोल चिंतनातून, प्रत्यक्ष आचरणातून हिंदु धर्माच्या शाश्वत तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली आहे. हिंदु धर्म परिवर्तनशील असल्यामुळे याच्या तत्त्वज्ञानाचा विकास अद्यापही वर्धिष्णु आहे. या धर्मात अनेक धर्मग्रंथांची भर पडतच रहाते आणि अनेक धर्मसुधारक जन्म घेतच असतात. इतर अभारतीय पंथांप्रमाणे हिंदूंनीही एकच धर्मसंस्थापक आणि एकच धर्मग्रंथ मानला असता, तर या हिंदु धर्माचेही एक साचलेल्या पाण्याचे डबके झाले असते. हिंदु धर्म कोणत्याही जीवजंतूंना क्षुद्र समजत नाही. प्रत्येक चेतन-अचेतन वस्तूत तो ईश्वराचा अंश पहातो. इतर अभारतीय पंथांप्रमाणे तो स्वतःला पापी समजत नाही. उलट ईश्वराचा अंशच मानतो; मात्र केवळ आपल्या प्रयत्नाने, पुरुषार्थाने आपल्यातील त्या ईश्वरी अंशाचा साक्षात्कार प्रत्येकाला करून घ्यावा लागतो. हिंदु धर्म हा अत्यंत सहिष्णु, मानवतावादी आणि तितकाच तो विज्ञानवादी धर्म आहे. काळाच्या कसोटीवर हा धर्म आणि त्यातील विज्ञानाची सत्यता सिद्ध झाली आहे.

श्री. शंकर गो. पांडे

२. भारत सामर्थ्याचा उपयोग इतरांना गिळंकृत करण्यासाठी करत नाही !

जगाच्या सुरक्षेसाठी आणि विश्वशांतीसाठी जगात हिंदु धर्म अन् हिंदूंचे अस्तित्व टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूनेही त्याचे अस्तित्व जपणे आवश्यक आहे. हिंदु धर्माने प्रस्थापित केलेली जीवनमूल्ये जगाने स्वीकारली नाहीत, तर जगाचा विनाश अटळ आहे. ‘हिंदु धर्म शांतीचा संदेश देतो’, हे खरे असले, तरी या धर्माने सामर्थ्याला कधीही उणे लेखलेले नाही; पण ‘हिंदु’ सामर्थ्यवान झाला, तरी तो आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग अमेरिका, रशिया किंवा चीन यांच्याप्रमाणे जगावर एकछत्री साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी करणार नाही. आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग लहान आणि दुबळ्या देशांना अंकीत (गुलाम) किंवा गिळंकृत करण्यासाठी निश्चितच करणार नाही !

भारताला आत्मनिर्भर बनायचे आहे; पण या समवेत महासत्ताच नव्हे, तर जगाला सुखी आणि समृद्ध जीवन देण्यासाठी भरतवंशाची परंपरा चालवणारा विश्वगुरु बनायचे आहे. १७ व्या शतकापर्यंत भारताचा जागतिक व्यापारात ३० टक्के सहभाग होता. भारतीय अनेक देशात जाऊन हिरे, मोती, कापूस, साखर, औषधी, कौशेय (रेशीम), मिरीमरिचादि सामुग्री (मसाले) इत्यादींचा व्यापार करत असत. यासाठी त्यांनी उत्तम आणि दणकट (मजबूत) जलयानांची (जहाज) बांधणीही केली होती. समुद्री मार्गाने व्यापार करण्यात भारत जगात अग्रेसर होता; पण त्यांनी इंग्रजांप्रमाणे व्यापाराच्या निमित्ताने विदेशात आपल्या वसाहती निर्माण केल्या नाहीत आणि कपटाने तिथे स्वतःची राजसत्ता स्थापन करून स्थानिकांना आपले आश्रित (गुलाम) बनवण्याचाही कधी प्रयत्न केला नाही. तेथील मूळ निवासींचे ना कधी शोषण केले ना त्यांच्यात कधी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. उलट त्यांना सुसंस्कृत आणि सभ्य बनवण्याचाच प्रयत्न केला.

३. शत्रूसह सर्वांना साहाय्य करणारा भारत !

‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ म्हणजे जगातील सर्व मानवांना आर्य म्हणजे सुसंस्कृत बनवणे. हेच हिंदूंचे अनादी काळापासूनचे ध्येय आहे. हिंदूंची हीच मानवीय वृत्ती पूर्वी होती, तशीच आजही दृढ (कायम) आहे. भारतानेच कोरोना महामारीसारख्या महाविनाशकारी आपत्तीच्या काळात संपूर्ण जगाला लसी पोचवल्या आणि लक्षावधी लोकांचे प्राण वाचवले; परंतु या साहाय्याची परतफेड म्हणून कशाचीही अपेक्षा केली नाही. अफगाणिस्तानमधून तालिबानींच्या हिंसाचारामुळे तेथून सहस्रो  हिंदु आणि शीख यांना पलायन करून भारतात यावे लागले; पण तेथील सामान्य जनतेची जेव्हा भुकेने दुर्दशा होऊ लागली, तेव्हा भारतानेच त्यांना लाखो टन गहू पाठवला. नेपाळमध्ये १४ मे २०१५ मध्ये जेव्हा तीव्र भूकंप होऊन जीवित आणि वित्त यांची अपार हानी झाली, तेव्हा भारतानेच त्यांना सर्वतोपरी साहाय्य करून त्या संकटातून नेपाळला सावरले. अनेकदा नेपाळ भारतविरोधी आणि चीनधार्जिणी भूमिका घेतो; पण याचा विचार न करता केवळ मानवीय दृष्टीकोनातून भारत नेपाळच्या साहाय्याला धावून गेला. तुर्कीयेने काश्मीरसंबंधात नेहमीच भारतविरोधी भूमिका घेतली; परंतु तिथे ६ फेब्रुवारी २०२३ ला ८ रिक्टर स्केलचा भूकंप झाला आणि भयानक विध्वंस झाला, तेव्हाही भारताने मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता निरपेक्षपणे तुर्कीयेला साहाय्य केले. भारताच्या शेजारी असणारे भूतान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश या देशांनाही संकटाच्या काळात साहाय्य करतांना भारताने कधीच आपला हात आखडता घेतला नाही.

४. पारंपरिक जीवनमूल्यांमुळे अण्वस्त्रांचा गैरवापर नाही !

आज जगात अनेक देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. त्यांच्याजवळ अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत; पण जीवनमूल्ये नाहीत. त्यामुळे या शस्त्रास्त्रांचा वापर कसा आणि केव्हा करायचा, हा विवेक त्यांच्याजवळ नाही. ‘या शस्त्रास्त्रांद्वारे संपूर्ण जगावर अधिसत्ता गाजवणे, छोट्या देशांना धाकात ठेवणे, या देशांना भरघोस आर्थिक साहाय्य करून त्यांना आश्रित बनवणे’, हीच सर्व विकसित देशांची मनीषा आहे. भारतही अण्वस्त्रसंपन्न आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी संपन्न आहे; पण भारताजवळ पारंपरिक अशी नैतिक जीवनमूल्ये आहेत. भारताची अण्वस्त्र  आणि शस्त्रसंपन्नता इतर लहान देशांना धाकात ठेवण्यासाठी किंवा त्यांचा भूभाग बळकावण्यासाठी नाही, तर ती केवळ आत्मरक्षणार्थ आहे. त्यामुळेच भारताने हे अनेकदा स्पष्ट केले आहे की, भारत कोणत्याही देशावर प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही; पण आमच्यावर कुणी अण्वस्त्र आक्रमण केले, तर आम्हीही अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागे-पुढे पहाणार नाही.

५. भारत हिंदूबहुल असल्याने हिंदूंच्या सर्वव्यापी तत्त्वज्ञानाचा पुरस्कर्ता !

एकटा भारतच अशी भूमिका घेतो; कारण तो हिंदूबहुल आहे. हिंदु धर्माची आणि भारताची निर्मितीच मुळी विश्वाच्या कल्याणासाठी झाली आहे. आपला धर्म अपौरुषेय आहे. त्यामुळे त्याची निर्मितीही भगवंतानेच केली आहे आणि या राष्ट्राची निर्मितीही पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळीच झाली आहे. हे राष्ट्र अनेक ऋषिमुनी, साधू-संत आणि विचारवंत यांच्या तपश्चर्या अन् सखोल चिंतन यांतून घडले आहे. ‘देवतांनाही याच भूमीत अवतार घ्यावा’, असे वाटले. हिंदूंच्या पूर्वजांनी कधीच केवळ स्वतःच्या हिताचा विचार केला नाही. त्यांनी सृष्टीतील मनुष्यप्राण्यासह पशूपक्षी, वृक्षवेली, जीवजंतू इत्यादींच्याही कल्याणाचा विचार केला. या सर्वांना मुक्तपणे जगण्याचा, फुलण्याचा, विकसित होण्याचा सारखाच अधिकार असल्याचे उच्चरवाने उद्घोषित केले.

६. अन्य पंथियांचे भरकटलेले ‘तत्त्वज्ञान’ !

जगातील ३ प्रमुख पंथांपैकी ख्रिस्ती, इस्लाम आणि ज्यू (ज्यूडाई) हे पंथ  ‘सेमेटिक’ म्हणजे एकांतिक विचारांचे आहेत. हे पंथ एकच आपापला एक प्रेषित (धर्मसंस्थापक) आणि एकच उपासनाग्रंथ मानतात. विशेष म्हणजे या तीनही पंथांचे अनुयायी ‘त्यांचाच पंथ जगात सर्वश्रेष्ठ असून त्यांच्याच पंथाला सर्वांनी मानावे आणि त्यानुसारच आचरण करावे’, असा आग्रहच नव्हे, तर प्रसंगी आतंकही (अट्टाहास) माजवतात. विशेषतः ख्रिस्ती आणि मुसलमान यांना अन्य धर्मियांचे अस्तित्वच मान्य नसून ‘सर्व जगाला ख्रिस्ती आणि मुसलमान बनवणे, यासाठी साम, दाम, दंड अन् भेद या मार्गांचाही अवलंब करणे’, यालाच ते त्यांचे पवित्र धर्मकर्तव्य समजतात.

हिंदु धर्माप्रमाणे इतर कोणत्याच पंथाला आध्यात्मिक अधिष्ठान नाही. सर्व प्रकारचे भौतिक सुख आणि तेही मनसोक्तपणे (मनमुराद) आपल्यालाच मिळावे, हेच त्यांचे जीवनध्येय आहे. मग ‘या सुखासाठी इतर जिवांचा आणि सृष्टीचीही हानी करणे यात काहीच पाप किंवा अन्याय नाही’, असे ते समजतात. ‘इंद्रियजन्य सुखोपभोग हेच मानवी जीवनाचे अंतिम गंतव्यस्थान आहे’, असे त्यांचे ‘तत्त्वज्ञान’ आहे. ‘ईश्वराने सृष्टीची निर्मिती केवळ मानवाच्या सुखासाठीच केली’, असा या सेमेटिक पंथांचा ठाम विश्वास आहे. आज जगातील सर्वच ख्रिस्ती आणि इस्लामी देशांतील सामाजिक, आर्थिक अन् राजकीय रचना अपयशी ठरत आहेत. हे सर्व देश आर्थिक आणि शस्त्रास्त्रसंपन्न असले, तरी हिंसा, गुन्हेगारी, अत्याचार, व्यसनाधीनता, कौटुंबिक कलह, घटस्फोट अशा अनेकविध समस्यांनी ग्रस्त अन् त्रस्त आहेत; कारण त्यांच्यासमोर हिंदु धर्माप्रमाणे कोणताच आदर्श नाही. होकायंत्र नसणारे जलयान (जहाज) जसे समुद्रात कुठेही भरकटू शकते, त्याप्रमाणे त्यांचे जीवन भरकटत चालले आहे. उपभोगाला विवेकाचे बंधन नसले की, असेच होणार. हिंदु धर्माने तत्त्वाविना राजकारण, नीतीविना व्यापार, श्रमाविना संपत्ती, चारित्र्याविना ज्ञान, मानवतेविना विज्ञान, विवेकाविना उपभोग आणि समर्पणाविना पूजा ही ७ महापापे मानली आहेत; पण अभारतीय धर्मांकडून (अन्य पंथियांकडून मात्र) नेमकी हीच पापे सर्रास केली जात आहेत. यांचे अजून एक चिंताजनक विचार ‘तत्त्वज्ञान’ असे आहे, ‘तुम्ही वरीलप्रमाणे कितीही पापाचरण करा; पण रविवारी चर्चमध्ये आणि शुक्रवारी मशिदीमध्ये जाऊन स्वतःच्या पापांचा स्वीकार (कबुली) करा, क्षमा मागा. असे केले की, तुमची सारी पापे धुतली जातील आणि तुम्ही दुसर्‍या दिवसापासून पहिल्यासारखीच पापे करायला मोकळे व्हाल.’ ‘आपल्या पंथाच्या प्रचारासाठी तुम्ही अन्य धर्मियांची हत्या केली, तरी ती क्षम्य आहे. या हत्येसाठी तुम्हाला शिक्षा तर होणारच नाही उलट या कृत्याचे पारितोषिक म्हणून मृत्यूनंतर तुम्हाला स्वर्गात हव्या तेवढ्या सुंदर तरुणी उपभोगायला मिळतील, उंची मद्य मिळेल, तुम्हाला पाहिजे ती सुखे मिळतील’, असे विकृत ‘तत्त्वज्ञान’ जगाला विनाशाकडे घेऊन जाईल, यात तीळमात्र शंका नाही.

७. केवळ सत्कर्म करण्याची शिकवण देणारा हिंदु धर्म !

याउलट कर्माचा सिद्धांत आहे, ‘जो पाप करील त्याला शिक्षा भोगावीच लागेल.’  प्रत्यक्ष ईश्वरही त्या शिक्षेपासून तुमची मुक्तता करणार नाही. ‘जसे कर्म कराल तसे फळ मिळेल’, हे हिंदु धर्मग्रंथात वारंवार आणि निक्षून सांगितले आहे. या जन्मात तुमच्या कर्माचे फळ मिळाले नाही, तर पुनर्जन्मात मिळणार, हे निश्चित. तुमचे कर्म त्याचे फळ तुमच्या पदरात टाकेपर्यंत तुमचा पिच्छा सोडणारच नाही. एक सुभाषित आहे,

यथा धेनुसहस्रेषु वत्सो विन्दति मातरम् ।
तथा पूर्वकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ।।

अर्थ : ज्याप्रमाणे वासरू सहस्रो गायींमधून आपल्या आईला अचूक शोधून काढते, त्याप्रमाणे आपण जे कर्म पूर्वजन्मी केलेले आहे, ते कर्म करणार्‍याच्या पाठोपाठ येतेच.

म्हणून हिंदु धर्मात नेहमी सत्कर्म करण्यावर भर दिला आहे. संत कबीर म्हणतात, ‘‘करता था तब क्यूं किया अब कर क्यूं पछताय । बोया पेड बबूलका आम कहांसे होय ।’’ म्हणजे ‘जेव्हा तू वाईट कर्म करत होतास, तेव्हा कधी मागचा-पुढचा विचार केला नाहीस. तू बाभळीचे (दुष्कर्माचे) बीज रुजवलेस मग त्याला आंबे (चांगले फळ) कसे येतील ?’ म्हणून हिंदु धर्म सांगतो की, ‘तुम्ही फळाची अपेक्षा न करता केवळ सतत सत्कर्म करत रहा. एकांतातसुद्धा दुष्कर्म किंवा दुर्विचार करू नका.’ अशी उदात्त शिकवण कोणत्या अन्य पंथाने दिली आहे ? हिंदुद्वेष्ट्यांनी याचा थोडा विचार करावा.

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ. (क्रमशः पुढच्या रविवारी)