विज्ञान आणि अध्यात्म यांच्यानुसार सगुण-निर्गुण !

अनेक वेळा आध्यात्मिक क्षेत्रात परमात्म्यासंबधी चर्चा चालू असतात. अन्य पंथ ‘ईश्वर एकच असून तो निर्गुण आहे’, या मताचे असतात. किंबहुना ते सगुण उपासना किंवा मूर्तीपूजा इत्यादींचाही विरोध करतात. सनातन हिंदु धर्म मात्र ईश्वराच्या सगुण-निर्गुण रूपाविषयी स्पष्टपणे सांगतो, तसेच सगुण, साकार, अवतार आणि मूर्तीपूजा यांविषयीही सांगतो. ‘सगुण कळल्याविना निर्गुण कळणे कठीण असते’, असे म्हटले जाते. त्यामुळे समाजात लोकांकडून अनेक वेळा प्रश्न विचारले जातात. त्यांचे म्हणणे असते, ‘ईश्वर केवळ निर्गुण आहे; पण सगुण नाही.’ त्यामुळे निर्गुण म्हणजे काय ? हे नेमके कुणालाच कळलेले नाही. त्यामुळे त्याची प्राप्ती झाली, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. त्याउलट सगुण साकाराची अनुभूती घेतल्याने त्याच्या अव्यक्त चराचर स्वरूपाची, म्हणजे निर्गुणाची अनुभूती घेणे सहज सुलभ आणि सोपे असते. यांसदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आतून विज्ञान आणि अध्यात्म, तसेच यांसदर्भात सगुण अन् निर्गुण यांविषयी काही सूत्रे सुचली. ती दोन्ही संकल्पनांना सुस्पष्ट करणारी असल्याची अनुभूती मला आली.


१. विज्ञानातील निर्गुण आणि सगुण

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने एकदा मला आतून सुचले की, समजा एका वेळी भौतिकशास्त्र शिकलेला विज्ञानवादी, रसायनशास्त्र शिकलेला विज्ञानवादी आणि सामान्य व्यक्ती एकत्रित आले अन् त्यांनी ‘पाणी म्हणजे काय ?’, या विषयावर चर्चा केली, तर ते विविध प्रकारे विश्लेषण करतील.

अ. रसायनशास्त्रानुसार पाण्याचे वर्णन : रसायनशास्त्र शिकलेला विज्ञानवादी हा रसायनशास्त्राच्या समीकरणानुसार पाणी, म्हणजे H2O असे म्हणेल आणि तसे कागदावर लिहूनही दाखवेल. हे झाले पाण्याचे निर्गुण स्वरूप; कारण येथे प्रत्यक्ष पाणी नव्हे, तर पाण्याचे रासायनिक स्वरूप कागदावर लिहिलेले असते. शास्त्रानुसार ते पाणीच असते; परंतु ते पिता येत नाही. त्यामुळे त्याने तहान भागवता येत नाही. ते केवळ ज्ञानार्जनापुरते उपयोगी असते.

आ. भौतिकशास्त्रानुसार पाण्याचे वर्णन : आता भौतिकशास्त्रही शास्त्र आहे.  रसायनशास्त्र शिकलेला पाण्याला H2O म्हणून सहज थांबतो; पण भौतिकशास्त्राचा विज्ञानवादी काय म्हणेल ? तो सांगतो, ‘नाही, नाही, हे पुरेसे नाही. १ ऑक्सिजन आणि २ हायड्रोजन यांचे अणू एकत्रित येऊन जे बनते, ते पाणी.’ मग तो पाण्याचा ‘मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म्युला’ कागदावर काढून दाखवतो की, H2O, म्हणजे २ हायड्रोजन आणि १ ऑक्सिजन यांची रचना असलेले द्रव म्हणजे पाणी. अर्थात् हे रसायनशास्त्राच्या व्यक्तीलाही  माहिती असते. एकूणच हे चित्र म्हणजे पाण्याच्या निर्गुण स्वरूपाच्या रचनेचे द्योतक असते. शास्त्राप्रमाणे ते पाणीच असते; परंतु ते पिण्यायोग्य किंवा तहान भागवणारे नसून केवळ ज्ञानार्जनापुरते उपयोगी असते.

इ. सामान्य व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाण्याचे वर्णन : सामान्य व्यक्तीला विचारले, तर तो एका पेल्यात पाणी घेऊन येईल आणि ‘हे पेल्यातील द्रव पदार्थ, म्हणजे पाणी’, असे सांगेल. हे प्रत्यक्षातील पाणी असल्याने ते पिणे शक्य आहे आणि त्याने तहानही भागवली जाते. या व्यक्तीला त्याचे शास्त्रीय ज्ञान नसले, तरी अनुभूती असते. त्यामुळे तो या पाण्याने कुणाचीही तहान भागवू शकतो. पुढे त्याने शास्त्र शिकले, तर त्याला पाण्याच्या निर्गुण स्वरूपाचेही ज्ञान होते. अर्थात् निर्गुणाला सगुणाची अनुभूती नसेल, तर निर्गुण शेवटपर्यंत काय आहे, ते कळणारच नाही.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२. सगुणाची सरलता आणि निर्गुणाच्या ज्ञानासाठी सगुणतेची आवश्यकता

अ. समजा आपल्याकडे एक रसायनशास्त्राचा H2O फॉर्म्युला लिहिलेला कागद आहे, एक ‘मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म्युला’चे चित्र काढलेला कागद आहे आणि तिसरे एका पेल्यात प्रत्यक्ष आणून ठेवलेले पाणी आहे. एखाद्या लहान मुलाला बोलावून त्याला या ३ गोष्टी दाखवल्या आणि विचारले की, यातील पाणी कोणते ? तर तो पाण्याच्या पेल्याकडे बोट दाखवेल.

आ. पुढे विज्ञानाचे शिक्षण घेतलेला एखादा मुलगा म्हणेल की, कागदावर लिहिलेले H2O हे पाणी आहे आणि ते या पेल्यातील द्रवपदार्थ होय किंवा या कागदावर ज्याचा ‘मॉलिक्युलर फार्म्युला’ काढला आहे, तो पदार्थ म्हणजे पेल्यातील पाणी होय.

३. विज्ञानवाद्यांचा अध्यात्माशी संघर्ष असण्याचे कारण

अ. विज्ञानवादी रसायनशास्त्री म्हणतो की, H2O, म्हणजे पाणी, तर विज्ञान शिकलेला भौतिकशास्त्री हा हायड्रोजनचे २ अणू आणि ऑक्सिजनचा १ अणू मिळून जे रसायन सिद्ध होते, ते पाणी आहे, असे म्हणेल. याचा अर्थ पाण्याची ‘मॉलिक्युलर’ आकृती असू दे किंवा त्याला H2O म्हणू दे, ते दोन्ही म्हणजे पेल्यातील पाणीच आहे.

आ. येथे कागदावर लिहिलेले H2O असो किंवा कागदावर ‘मॉलिक्युलर फॉर्म्युला’चे काढलेले चित्र, हे पाण्याचे शास्त्रीय प्रतीक, म्हणजे पाण्याचे निर्गुण स्वरूप मानले.

असे असेल, तर पेल्यातील पाणी, हे त्याचे सगुण स्वरूप ठरते; कारण कागदावरील H2O किंवा कागदावर ‘मॉलिक्युलर फॉर्म्युला’ ज्ञानपिपासा पूर्ण करील; परंतु तहान भागवू शकणार नाही. याउलट पेल्यातील पाणी निश्चितच तहान भागवून पाण्याची अनुभूती देऊ शकते.

इ. असे अध्यात्मात ब्रह्मांडाचे जे मूलतत्त्व आहे, त्याला अध्यात्म निर्गुण, निराकार परमात्मा (सत्चित आनंदस्वरूप अविनाशी तत्त्व) म्हणते आणि त्याच्या शोधात साधकांसह विज्ञानवादीही प्रयत्नरत आहेत. सनातन हिंदु धर्म दर्शन सोडले, तर अन्य सर्व पंथांसह विज्ञानवादी ‘परमात्म्याचे सगुण स्वरूप असू शकते’, हे मान्य करत नाहीत. याचाच अर्थ कागदावरील H2O असो किंवा कागदावरील ‘मॉलिक्युलर फॉर्म्युला’ दोघेही पाण्याची चव आणि तहान भागल्याची अनुभूती देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे निर्गुण काय आहे ? हे ठाऊक नसलेले सत्चित आनंदाची अनुभूती कशी घेऊ शकतील ? ज्यांना अनुभूतीच नाही, ते निर्गुण काय जाणतील ? येथेच निर्गुण अथवा एकेश्वरवाद्यांची दिशा चुकत आहे.

४. अध्यात्माची तहान सगुण उपासनेच्या भगवतभक्तीनेच पूर्ण होते !

अध्यात्मात शाब्दिक किंवा मानसिक ज्ञान झाले; पण आनंदाची (आत्मस्वरूपाची) अनुभूती आली नाही, तर जिवाची आध्यात्मिक (अंतिम सत्याच्या अनुभूती घेतल्याची) तहान भागत नाही. याचा अर्थ अध्यात्मात केवळ निर्गुण उपासना, म्हणजे केवळ ज्ञानप्राप्तीच्या कोरड्या प्रयत्नांनी परिपूर्णता लाभत नाही. एखाद्या सामान्य भक्ताला ज्ञान नसेल; पण त्याने भगवंताची प्रचीती (प्रत्यक्षानुभूती) घेतलेली असते. त्यांना आध्यात्मिक तृप्ती लाभते. एका अर्थाने निर्गुण उपासनेची असो किंवा ज्ञान उपासनेची असो, अध्यात्माची तहान सगुण उपासनेच्या भगवद्भक्तीनेच पूर्ण होते. आद्यशंकराचार्य असो किंवा महर्षि व्यास असो, ज्ञान साधनेनंतर भक्तीसाधनेने त्यांना अनुभूती आल्यानंतर चित्त शांत झाले होते. अनुभूती घेतलेल्या भक्तांना आवश्यक तेवढे ज्ञान भगवंत देत असतो आणि म्हणून अशिक्षित संतांनी केलेले गद्यात्मक किंवा पद्यात्मक लिखाण आजही चिरंतनतेची अनुभूती देते.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (ऑगस्ट २०२३)

सगुणाविना निर्गुणाची वाट न सापडणे !

पाण्याचा गुण पिणार्‍याची तहान भागवणे, हा आहे. तहान भागणे, ही व्यक्तीची प्रत्यक्षानुभूती असते. कागदावर लिहिलेला रसायनशास्त्राचा फॉर्म्युला H2O असो किंवा कागदावर काढलेले पाण्याचे ‘मॉलिक्युलर ऑर्बिटल’ फॉर्म्युल्याचे चित्र असो, त्याने जशी कुणाची तहान भागू शकत नाही, तसे ते वाचणार्‍याला किंवा पहाणार्‍याला तहान भागण्याची अनुभूती येणार नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे अध्यात्मात निर्गुणाच्या उपासनेची कास धरत सगुण उपासना सांगितली आहे. प्रत्यक्ष पाणी आहे; मात्र त्याचे विज्ञान माहिती नसले, तरीही तहान भागते आणि समाधान लाभते. तसेच अध्यात्मात सगुण उपासना, म्हणजे भगवदभक्ती  केल्याने भगवंताच्या आनंदाची अनुभूती येते. या अनुभूतीनंतर भक्ताला भगवंताचे (ब्रह्मांडाचे) चराचराला व्यापून असलेल्या परमस्वरूपाचे (परमात्म्याचे) पूर्ण ज्ञान होते. भक्तीनंतरचे हे ज्ञान, म्हणजेच ब्रह्मांडातील अंतिम सत्याची अनुभूती येणे होय. ही सगुणाधारित निर्गुण उपासना होय.

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे (ऑगस्ट २०२३)

अध्यात्म आणि विज्ञान

१. अध्यात्म, म्हणजे साधना करत जिवाने आंतरिक अनुभूतीद्वारे मन आणि बुद्धी यांपलीकडील चराचरांतील (अंर्तबाह्यातील आणि सजीव-निर्जिवातील) एकमात्र शाश्वत अपरिवर्तनशील तत्त्वाची अनुभूती घेणे.

२. विज्ञान, म्हणजे बाह्य प्रयोग आणि निरीक्षणे यांद्वारे मन, बुद्धी अन् ज्ञानेंद्रिये यांच्या माध्यमांतून बाह्य विश्वाच्या अशाश्वत परिवर्तनशील रचनेला जाणून घेण्याची प्रक्रिया.

३. विज्ञान हे बाह्य परिवर्तनशील विश्वाचा अनुभव, तर अध्यात्म हे अंर्तबाह्य शाश्वत स्वरूपाची अनुभूती असते.

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे (ऑगस्ट २०२३)