२ सप्टेंबरला सकाळी अवकाशात झेपावणार ‘आदित्य एल् १’ यान !

  • भारताची पहिली सूर्य मोहीम !

  • ४ मासांनंतर पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर पोचून करणार सूर्याचे परीक्षण

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेच्या अंतर्गत सूर्याचे परीक्षण करण्यासाठी जाणारे ‘आदित्य एल् १’ हे यान २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील कॅप्टन सतीश धवन अंतराळ केंद्र येथून प्रक्षेपित केले जाणार आहे. ‘पी.एस्.एल.व्ही. – सी ५७’ या रॉकेटद्वारे ते प्रक्षेपित केले जाईल. ‘आदित्य-एल् १’ ४ मासांनंतर पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटरवर असणार्‍या ‘लँग्रेज १’ या ठिकाणी पोचणार आहे. याच ठिकाणी स्थिर राहून हे यान सूर्याचा बाहेरील स्तर (कोरोना) याचे परीक्षण करणार आहे. या स्थानापासून सूर्य आणखी १४ कोटी ८५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. ‘आदित्य एल् १’ यान स्वतःसमवेत ७ उपकरणे घेऊन जाणार आहे.

१. ‘लँग्रेस १’ या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणाचे बळ एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होते. नासाच्या मते या ठिकाणी यानाला स्थिर रहाण्यासाठी अल्प इंधन खर्च होतेे.

२. सूर्याचे स्वतःचे तापमान ६ सहस्र डिग्री सेंटीग्रडहून अधिक असतांना त्याच्या कोरोनाचे तापमान १० लाख डिग्री सेंटीग्रेडपर्यंत कसे पोचते ?, याचा अभ्यास हे यान करणार आहे.