‘विक्रम’ लँडरवरील उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर मोजली कंपने !

  • इस्रो घेत आहे कंपनांमागील कारणांचा शोध !

  • चंद्रावर भूकंप होत असल्याचीही शक्यता !

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘चंद्रयान-३’च्या ‘विक्रम’ लँडरवर बसवलेल्या ‘इंस्ट्रुमेंट ऑफ लुनार सिस्मिक अ‍ॅक्टिव्हिटी’ (आय.एल्.एस्.ए.) या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर कंपनांची नोंद केली आहे. हा भूकंप असू शकतो, या दृष्टीने इस्रोकडून कंपनांमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

१. ‘इस्रो’ने ट्वीट करून माहिती देतांना म्हटले आहे की, चंद्रयान-३ च्या विक्रम लँडरवरील आय.एल.एस्.ए. उपकरण ‘मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम’ (एम्.इ.एम्.एस्.) तंत्रज्ञानावर आधारित आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असे उपकरण पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या उपकरणाने चंद्रावरील कंपनांची नोंद केली आहे.

२. प्रज्ञान रोव्हरने दुसर्‍यांदा चंद्रावर सल्फर असल्याची पुष्टी केली आहे. इस्रोने म्हटले आहे की, आम्ही आता शोधत आहोत की, चंद्रावर सल्फर कोठून आले ? आंतरिक, ज्वालामुखी कि उल्का?