पुणे येथे गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेणार्‍या कर्मचार्‍याचे निलंबन !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेणारे कर्मचारी नेवासे यांना निलंबित केले आहे. विद्यार्थ्यांची लूट करणार्‍यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. विद्यापिठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करतात. याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला होता. प्रथम भंडारी या विद्यार्थ्याकडून कर्मचारी नेवासे यांनी पैसे घेतले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या तक्रारीअन्वये कर्मचार्‍याला थेट निलंबित केले आहे.

विद्यापिठातील कारभाराच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी केलेले आरोप

१. कोणत्याही कागदपत्रासाठी संबंधित विभागाकडे गेले असता विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात.

२. विद्यार्थ्यांना कामासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागत असल्याने विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ वाया जातो.

३. विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करून त्यांना मानसिक त्रास दिला जातो.

(असे प्रकार विद्यापिठात चालतात, तर ते विद्यापीठ व्यवस्थापनाच्या लक्षात येत नाही का ? यासाठी अभाविपच्या विद्यार्थ्यांना तक्रार का करावी लागली ? याचाही विचार व्हायला हवा. अजून कोणत्या प्रकारच्या अयोग्य कृती विद्यापिठात होत आहेत, हेही पहावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये होणारा भ्रष्टाचार समाजाची नैतिकता पराकोटीची अधोगतीला गेली आहे, हे दर्शवतो. अशा भ्रष्ट कर्मचार्‍यांना निलंबन नको, तर बडतर्फ करून कठोर शिक्षाही हवी !