गणेशोत्सव मंडळांना उत्सवासाठी ५ वर्षांची अनुमती मिळणार !

पत्रकार परिषदेत बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोबत अन्य मान्यवर

पुणे – गणेशोत्सव मंडळांना उत्सवासाठी ५ वर्षांची अनुमती मिळणार असल्यामुळे त्यांना प्रतिवर्षी अनुमती घेण्याची आवश्यकता नाही; मात्र नवीन गणेशोत्सव मंडळांना अनुमती घ्यावी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोची सेवा रात्री १२ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येईल, तर ध्वनीक्षेपकास २३, २४, २६, २७ आणि २८ सप्टेंबर या रात्री १२ वाजेपर्यंत अनुमती राहील, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आदी उपस्थित होते.

विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासन नियोजन करत आहे; मात्र मंडळांनीही योग्य प्रतिसाद द्यावा. वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मूर्ती विसर्जन करतांना उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.