खामगाव (बुलढाणा) येथे गणेशोत्सवकाळात ‘डीजे’ वाजवण्यास अनुमती नाही !

पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

खामगाव (बुलढाणा) – येत्या १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून या काळात ‘डीजे’ (‘डीजे’ (डिस्क जॉकी) – एक व्यक्ती वेगवेगळ्या संगीतांचे मिश्रण करून त्याचे प्रसारण करतो.) वाजवण्याला अनुमती मिळणार नाही. त्याऐवजी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन येथील पोलीस उपअधीक्षक विनोद ठाकरे यांनी येथील महात्मा गांधी सभागृहात आयोजित केलेल्या डीजे चालक आणि मालक यांच्या सभेत केले. या वेळी विविध पदांवरील पोलीस अधिकारी आणि  मान्यवर उपस्थित होते.

विनोद ठाकरे पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार निवासी क्षेत्रात डीजे वाजण्याचा आवाज दिवसा ५५, तर रात्री ४५ डेसिबल इतका ठेवावा. उत्सवकाळात डीजेमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवू नये, तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करावे. डीजेऐवजी मिरवणुकीत ढोल-ताशे, बँड-बाजा अशा प्रकारच्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन केले.

संपादकीय भूमिका

सर्वत्रच्या पोलिसांनी असा निर्णय घेऊन गणेशोत्सव शांततेत आणि भक्तीभावात साजरा करावा !