युक्रेनने आक्रमण केल्याचा रशियाचा आरोप
मॉस्को (रशिया) – रशियाच्या पेस्कोव्ह शहरातील विमानतळावर ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात रशियाची वाहतूक करणारी ४ सैनिकी विमाने नष्ट झाली. या आक्रमणात कोणतीही जीवित हानी झाली नाही. रशियाकडून आक्रमण करणार्या ड्रोन्सना पाडण्याचा प्रयत्न केला जात होता. या आक्रमणामुळे पेस्कोव्ह विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून हवाई क्षेत्रही बंद करण्यात आले आहे. रशियाने या आक्रमणासाठी युक्रेनला उत्तरदायी ठरवले आहे. रशियाने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने काळ्या समुद्रात युक्रेनचे ४ ड्रोन नष्ट केले आहेत.
हे आक्रमण १२ ड्रोनद्वारे करण्यात आले. पेस्कोव्ह शहर एस्टोनिया आणि लॅटव्हिया या देशांच्या अगदी जवळ आहे. एस्टोनिया पेस्कोव्हपासून केवळ ३० किमी, तर लॅटव्हिया ६० किमी अंतरावर आहे. हे दोन्ही देश ‘नाटो’ संघटनेचे सदस्य आहेत. (‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली सैनिकी संघटना)
सौजन्य वनइंडिया न्यूज
रशियामध्ये यापूर्वीही झाली होती ड्रोनद्वारे आक्रमणे !
रशियामध्ये गेल्या काही मासांपासून राजधानी मॉस्को आणि इतर शहरांवर सातत्याने ड्रोनद्वारे आक्रमणे केली जात आहेत. यात जीवित हानी झाली नसली, तरी रशियाची आर्थिक हानी होत आहे. यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे निवासस्थान असलेल्या ‘क्रेमलिन’वर २ ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले होते.