काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांत १००० रोपांची लागवड  

‘चला जाणूया नदीला’ शासनाचा उपक्रम

रत्नागिरी – जिल्हा प्रशासन समिती सदस्य, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्रामपंचायत येरवंडे कणगवली आणि मौजे येरवंडे महादेव देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला जाणूया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये वृक्षारोपण अभियान  उपक्रम राबवण्यात आला.

या अभियानांतर्गत वनविभागाकडून पुरवण्यात आलेली शिवण, बहावा, हरडा, हेला, आवळा, जांभूळ, रिंगी, मोहगणी, दालचिनी, आटकी, करंज, पेरू, बेल, साग, लिंबू, शमी, रातांबी, गुलमोहर रोपे गाव रस्त्याच्या दुतर्फा आणि देवराई येथे एकूण १००० रोपांची लागवड करण्यात आली.

‘चला जाणूया नदी’ला या अभियानात काजळी नदी तिरावरील महसूल गावांतून वृक्षारोपण करून नदीकाठाचे, तसेच डोंगर भागातील धूप थांबवणे, पाणलोट क्षेत्रात भूजल पाणी साठा वाढवणे, फूड फॉरेस्ट संकल्पानेतून वन्य प्राण्यांना विस्थापनापासून थांबवणे, पर्यावरण संवर्धन या हेतूने सर्व पर्यावरणप्रेमीं ग्रामस्थांनी वृक्षारोपण ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.

या अभियानात काजळी नदी प्रहरी जिल्हा समिती सदस्य समन्वयक अनिल कांबळे, समन्वयक रोहन इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे, डॉ. महादेव बडगे, प्रा. अवंतिका केळुस्कर, प्रा. अनुप्रिया प्रभु, वनरक्षक सूरज तेली, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ९० विद्यार्थी सहभागी झाले होते. येरवंडे गावचे ग्रामस्थही या अभियानात सहभागी झाले. या सर्व उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस्. कुलकर्णी, तसेच उपप्राचार्य डॉ. के.आर्. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.