गणेशोत्सव जवळ आला असतांना १३ पूल धोकादायक असल्याची दिली चेतावणी !

विलंबाने जाग आलेला मुंबई महानगरपालिकेचा पूल विभाग !

मुंबई – गणेशोत्सव जवळ आल्यामुळे मुंबईतील विविध मूर्तीशाळांमधील मूर्ती मिरवणुकीद्वारे सार्वजनिक मंडळांमध्ये नेण्यात येत आहेत. या मिरवणुकींना प्रारंभ होईपर्यंत धोकादायक पुलांविषयी कोणतीही वाच्यता न करणार्‍या  मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाने मिरवणूक मार्गातील १३ पूल धोकादायक असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ‘या धोकादायक पुलांवर अधिक वेळ थांबू नका. पुलावरून जातंना काळजी घ्या’, आदी वरवरच्या सूचना पूल विभागाने दिल्या आहेत.

१. या पुलांमध्ये महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज, कॅरोल रेल ओव्हर ब्रीज (प्रभादेवी), टिळक रेल्वे ओव्हर ब्रीज (दादर), करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज, मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज, फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज, केनडी रेल्वे पूल, फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज, बेलासीस मुंबई सेंट्रलजवळील ब्रीज आणि घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज या पुलांचा समावेश आहे. यांमध्ये रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश अधिक आहे.

२. करी रोड रेल्वेस्थानक, चिंचपोकळी रेल्वेस्थानक आणि मंडलिक पूल यांवर एकाच वेळी १६ टनहून अधिक वजन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पूल विभागाकडून करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

केवळ नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करून प्रशासनाचे दायित्व संपत नसते. मुळात ‘गणेशोत्सवापूर्वीच धोकादायक पुलांची कामे का झाली नाहीत ?’, ‘या पुलांवर एखादी दुर्घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ?’, हेही प्रशासनाने निश्‍चित करावे, तसेच या पुलावर कोणती दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासनाने प्राधान्याने करणे आवश्यक आहे !