सेतू कार्यालयातील अपहार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करणार ! – शंभूराज देसाई

अपहारापैकी १० लाख ३७ सहस्र रुपयांचा महसूल शासनजमा !

पत्रकार पद्माकर सोळवंडे यांच्‍या तक्रारीनंतर जिल्‍हाधिकार्‍यांनी या प्रकरणाच्‍या चौकशीचे आदेश प्रांताधिकार्‍यांना दिले. त्‍याप्रमाणे १० ऑगस्‍ट या दिवशी प्रांताधिकार्‍यांनी जिल्‍हाधिकार्‍यांना अहवाल दिला. या अहवालात ठेकेदार आस्‍थापनाने आदेशाचे उल्लंघन करत अपहार केला असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे, तसेच तक्रारदारांनी नमूद केलेल्‍या रकमेहून अधिक रकमेचा अपहार झाला आहे, असेही नमूद केले आहे. तक्रारीनंतर ३० सहस्र ८७१ प्रतिज्ञापत्रांच्‍या ऑनलाईन पोर्टलवर नोंदी करून १० लाख ३७ सहस्र रुपयांचा महसूल ठेकेदार आस्‍थापनाकडून शासनजमा करून घेतला असल्‍याचे प्रांताधिकार्‍यांनी दिलेल्‍या अहवालात स्‍पष्‍ट केले आहे, अशी माहिती पत्रकार पद्माकर सोळवंडे यांनी दिली.

मंत्री शंभूराज देसाई

सातारा, २८ ऑगस्‍ट (वार्ता.) – येथील सेतू कार्यालयातील अपहारप्रकरणी तहसीलदारांकडे अनेक तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. याची सखोल चौकशी करून तहसीलदारांनी जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्‍याकडे अहवाल दिला आहे; मात्र जिल्‍हाधिकारी सुटीवर असल्‍यामुळे १५ दिवस होऊनही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. जिल्‍हाधिकारी आल्‍यानंतर तात्‍काळ दोषींवर कडक कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती राज्‍य उत्‍पादन शुल्‍कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

नियमाप्रमाणे ठेकेदाराने ऑनलाईन सुविधेचा उपयोग करून सर्व नोंदी शासनाच्‍या पोर्टलवर करून द्यायच्‍या आहेत. सातारा तहसील कार्यालयातील ठेकेदार आस्‍थापन ‘सार्.आय.टी. रिसोर्सेस’ यांनी जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत प्रतिज्ञापत्रांच्‍या नोंदी केल्‍या; मात्र अनधिकृतपणे आणि नियमभंग करत या नोंदी ऑनलाईन न करता ऑफलाईन पद्धतीने केल्‍या. यामुळे शासनाची १४ लाख ७१ सहस्र रुपयांची हानी झाली असून या रकमेचा ठेकेदार आस्‍थापनाने अपहार केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. याविषयी ठेकेदार आस्‍थापन आणि सातारा तहसीलदार यांच्‍यावर कारवाई करण्‍याची मागणी पत्रकार पद्माकर सोळवंडे यांनी जिल्‍हाधिकार्‍यांकडे केली होती.