वर्ष २०२२ च्या महाशिवरात्रीच्या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार म्हटलेला शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप सगळ्यांसाठी उपलब्ध करण्यात आला होता. या वेळी हा नामजप मुंबई येथील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनाही ऐकायला पाठवला होता. सौ. सोनिया परचुरे यांनी नुकतीच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट दिली होती. हा नामजप ऐकून सौ. सोनिया अतुल परचुरे यांना आलेली अनुभूती येथे त्यांच्याच शब्दात दिली आहे.
१. नामजप ऐकतांना कारंजासारखी हातांची हालचाल होऊन मुद्रा होणे
‘हा नामजप ऐकून पुष्कळ चांगले वाटले. नामजप ऐकतांना नृत्यात कारंजासारखी हातांची हालचाल होऊन ध्यानाला बसण्याची जी हाताची मुद्रा होते, तशी मुद्रा होत होती.
(नृत्यातील मुद्रेचे विश्लेषण : उजव्या हाताचा पंजा त्याची बोटे डाव्या मनगटाकडे येतील असा डाव्या पंजावर ठेवावा आणि दोन्ही हात नाभीच्या खाली ओटीपोटाजवळ स्थिर करावेत. उजव्या हाताची सर्व बोटांची टोके एकमेकांजवळ आणून पुन्हा दूर करावीत, असे पुन:पुन्हा केल्यावर (कारंजासारखी हालचाल) जाणवते, त्याप्रमाणे जाणवले. – संकलक)
२. शिवाचा नामजप नियमित ऐकला, तर स्थिरता येईल, असे वाटणे
हा नामजप ऐकतांना मी गाडी चालवत असल्याने मधून मधून माझी एकाग्रता भंग होत होती; पण मला असे वाटले, ‘हा जप नियमित ऐकला, तर याचा नक्कीच परिणाम होईल. पूर्ण स्थिरता यायला तो पुनःपुन्हा ऐकायला हवा.’ एका स्वरनादामध्ये तो नामजप झाला आहे. (नामजप म्हणतांना आवाजात चढ-उतार नाही.) हा जप मला खूप आवडला. या नामजपाच्या मागे तानपुरा देखील लावलेला नाही. केवळ नामजप असलेला हा एक वेगळाच नामजप आहे.
३. ‘जपातील ‘ॐ’ आणि ‘शिवाय’ लांबवलेला नसण्यामागे काहीतरी कारणमीमांसा असेल’, याची जाणीव होणे
मला आरंभी वाटले, ‘ॐ’ आणि ‘शिवाय’ हे लांबवायला हवेत कि काय ?’ मग मला पटकन आठवले, ‘मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रामध्ये आले होते. तेव्हा मी ‘ॐऽऽऽ’ (ॐ लांबवून म्हणणे) लांबवून म्हटल्यानंतर माझी मैत्रीण सुश्री सुप्रिया नवरंगे मला म्हणाली, ‘‘असे लांबवू नकोस.’’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल; म्हणूनच न लांबवता जप केला आहे.’ हा जप छान आहे !’
(‘प्रत्येक जपातील अक्षर म्हणतांना ते किती लांबवावे ? कशा पद्धतीने म्हणावे ? जेणेकरून त्या जपातून त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात ऐकणार्याला मिळतील’, असा सूक्ष्म अभ्यास महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करायला सांगितला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा नामजप म्हटलेला आहे. त्यामुळे त्यात चैतन्य अधिक आहे.’ – कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.)
– सौ. सोनिया अतुल परचुरे (कथ्थक अलंकार), दादर, मुंबई. (२.३.२०२२)
|