मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मनसेची जागर यात्रा !

रत्नागिरी तालुक्यातील निवळी ते वांद्री दरम्यान पदयात्रा !

रत्नागिरी – गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका पूर्ण होणे अवघड आहे. पहिले रस्ता करा, नाहीतर मनसेच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी मनसेचे नेते श्री. संदीप देशपांडे यांनी दिली. २७ ऑगस्ट या दिवशी अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने तालुक्यातील निवळी ते वांद्री दरम्यान पदयात्रा काढली. या यात्रेची सांगता करतांना ते बोलत होते.

श्री. संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही लोकांचे काम करतोय, हे आमच्या घरचे काम नाही. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला भ्रष्टाचार करण्यासाठी इथे पाठवले का ?’ , असेही त्यांनी या वेळी विचारले.

मनसेच्या आंदोलनाची पार्श्वभूमी

अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि १५ सहस्र कोटी रुपये खर्चूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करावे, यासाठी मनसेने २७ ऑगस्टपासून जागरयात्रा काढली आहे. मनसेच्या ८ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून पदयात्रा असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे. त्यानंतर कोलाडमध्ये जागरयात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरे भाषण करणार आहेत.

या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव असून यात्रेचा दुसरा टप्पा भरणा नाका ते राजापूर असेल. तिसर्‍या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.