मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

परभणी – पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाडा येथील गोदावरी खोर्‍यात आणायचे आहे. मराठवाड्यातील मागील पिढीने दुष्काळ पहिला असला, तरी पुढील पिढीला मात्र तो पाहू देणार नाही, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. २७ ऑगस्ट या दिवशी येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील काही भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात प्रत्येकी ४ वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. वर्ष २०१४ मध्ये ५३ टक्के, तर वर्ष २०१८ मध्ये ६४ टक्के पाऊस होता. आताही ५० टक्क्यांच्या जवळपास पाऊस पडला आहे. त्यामुळे आम्ही मराठवाड्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एखाद्या भागात पाऊस अधिक झाल्यास तिथून दुसर्‍या ठिकाणी पाणी नेण्यात येईल.