रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच चिपळूण येथे ‘श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने वस्त्रसंहिता प्रबोधन फलकाचे श्री. रमेश शिंदे यांच्या हस्ते अनावरण !
चिपळूण, २७ ऑगस्ट (वार्ता.)- व्यावहारिकदृष्ट्या शाळा, रुग्णालये, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी वस्त्रसंहिता (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली- ड्रेस कोड) लागू असते. त्याप्रमाणे मंदिरातही तेथील चैतन्याचा भक्तगणांना लाभ व्हावा, यासाठी योग्य वस्त्रे कोणती परिधान करायला हवीत ? याचे शास्त्र आहे. हिंदु समाज मात्र बराच काळ या माहितीपासून वंचित राहिला. हे शास्त्र हिंदूंपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. यासाठी प्रबोधन करणारे फलक मंदिरात लावण्याविषयी महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची अनुकूलता आहे. आपल्या मंदिरात आदर्श वस्त्रसंहिता असायला हवी, असे देवस्थानांना वाटणे, हे पुष्कळ महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
२७ ऑगस्ट या दिवशी शहरातील ‘श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने वस्त्रसंहिता प्रबोधन फलकाचे श्री. रमेश शिंदे आणि श्री भार्गवराम परशुराम संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांच्या हस्ते अनावरण झाले. त्या वेळी ते बोलत होते.
वस्त्रसंहितेविषयी माहिती देतांना श्री. शिंदे म्हणाले, ‘‘आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात १६५ मंदिरांत वस्त्रसंहिता प्रबोधनफलक लावण्यात आले आहेत. मंदिर आणि त्यांचे विश्वस्त यांच्या विविध समस्यांविषयी विचारविनिमय करण्यासाठी अष्टविनायक, ५ ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तीपिठे यांसह ३७७ मंदिरांच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जळगाव येथे राज्यस्तरीय मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक झाली.’’ हिंदु जनजागृती समितीच्या स्थापना भूमीत, म्हणजेच रत्नागिरीत या प्रबोधन फलकांचे अनावरण करण्याची संधी ‘श्री देव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट’ने दिल्यासाठी श्री. शिंदे यांनी देवस्थानचे आभार व्यक्त केले. देवस्थानच्या वतीने श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या वेळी देवस्थान विश्वस्त श्री. समीर शेट्ये, श्री. किशोर शेट्ये, श्री. पंकज कोळवणकर, सुमंता शिंदे, खेड येथील इच्छापूर्ती गणेश मंदिराचे अध्यक्ष श्री. शैलेश जागुस्टे, श्रीकृष्ण मंदिर हवेलीचे श्री. रमेश कानजी नंदा, कोंढे येथील श्री वाघजाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. अशोक नलावडे, पेढे श्री कामधेनु मंदिराचे अध्यक्ष श्री. मुकुंद वारे, पेठ माप येथील महाकाली देवस्थानचे श्री. मोहन तांबट, उद्योजक श्री. अमित जोशी, भाजपचे शहराध्यक्ष श्री. आशिष खातू, श्री. उल्हास भोसले, कुडप येथील गोपाळ कृष्ण मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष जाधव, पाग येथील श्री. प्रकाश सावंत, परशुराम देवस्थानचे श्री. जयदीप जोशी, श्री. संकेत राऊत, श्री. बाजीराव खंडजोडे, श्री. महेंद्र देवळेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदेल सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके आदी उपस्थित होते.