(म्हणे) ‘मोदी चंद्राचे मालक नाहीत, जग आपल्यावर हसेल !’ – काँग्रेसचे नेते राशिद अल्वी

‘शिवशक्ती’ नामकरणावरून काँग्रेसचे पित्त खवळले !

काँग्रेसचे नेते राशिद अल्वी

नवी देहली – ‘चंद्रयान-३’ चंद्रावर ज्या जागी उतरले, त्याला पंतप्रधान मोदी यांनी ‘शिवशक्ती’ असे नाव दिल्यावरून काँग्रेसचे पित्त खवळले आहे. काँग्रेसचे नेते राशिद अल्वी म्हणाले की, पंतप्रधानांनी ‘शिवशक्ती’ हे नाव कसे काय दिले ? ते चंद्राचे मालक नाहीत. मोदी यांनी केलेल्या या नामकरणावरून जग आपल्यावर हसेल.

या वेळी पत्रकारांनी अल्वी यांना विचारले की, वर्ष २००८ मध्ये जेव्हा ‘चंद्रयान-१’चा भाग चंद्रावर पाडण्यात आला होता, तेव्हा काँग्रेस सरकारने त्या जागेचे नाव भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून का ठेवले ? यावर अल्वी म्हणाले की, नेहरूंनी विक्रम साराभाई यांच्यासमवेत ‘इस्रो’ची स्थापना केली होती. नेहरू यांची तुलना अन्य कुठल्या नावाशी केली जाऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी या विषयावरून राजकारण करत आहेत.

भाजपने दर्शवला विरोध !

अल्वी यांच्या या वक्तव्याला विरोध करत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेसची ही भूमिका, म्हणजे ‘भारत विरुद्ध फॅमिली फर्स्ट’चा (कुटुंब पहिले) प्रकार आहे. जर संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार असते, तर ‘चंद्रयान-२’ आणि ‘चंद्रयान-३’ त्यांनी पाठवलेच नसते. जर पाठवलेच असते, तर चंद्रावरील त्या जागांचे नामकरण ‘इंदिरा पॉईंट’ आणि ‘राजीव पॉईंट’ असे केले असते.

संपादकीय भूमिका 

भारताच्या प्रतिष्ठेची एवढी काळजी असणारे अल्वी हे काँग्रेस आणि तिचे राहुल गांधी यांच्यासारखे नेते यांच्या हास्यास्पद वक्तव्यांमुळे जगात भारताचे हसे होत आहे, याविषयी कधी काही बोलत का नाहीत ?