कोल्हापूर – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर वन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या भूमीवर मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झाली आहेत. या गडावर लोकांना रहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या खोल्यांमध्ये मद्यप्राशन आणि जुगार खेळला जातो. गडावर असलेल्या दर्ग्याच्या आसपास कोंबड्या आणि बोकड यांच्या विक्रीची अवैध दुकाने असून तेथे सर्वत्र मांस, कोंबड्यांची पिसे अन् मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला आढळून येतो. त्यामुळे गडाचे पावित्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तरी विशाळगडावर झालेले सर्व अतिक्रमण तात्काळ जमीनदोस्त करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार आणि विशाळगडमुक्ती आंदोलनाचे निमंत्रक श्री. नितीनराजे शिंदे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केली.
या प्रसंगी सांगली येथील अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे श्री. सुनील घनवट, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे उपस्थित होते.
श्री. नितीन शिंदे पुढे म्हणाले, ‘‘वन विभाग आणि पुरातत्व अधिकारी यांनी विशाळगडाला भेट देऊन पहाणी करून पारदर्शी अहवाल शासनाला सादर करावा. विशाळगडाची, तसेच तटबंदीची डागडुजीही करणे आवश्यक आहे. बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई अहिल्यादेवी भोसले यांच्या समाधीची दुरवस्था झाली असून त्यांचा जीर्णोद्धार करण्यात यावा. विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शेवटच्या भेटीचे भव्य शिल्प उभारण्यात यावे, अशा मागण्याही आम्ही शासनाकडे करत आहोत.’’
संपादकीय भूमिका :गड-किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणावर प्रशासन स्वतःहून कारवाई कधी करणार ? |