प्रिगोझिन यांच्या काही चुका झाल्या असल्या तरी, ते एक प्रतिभावंत उद्योगपती होते ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया

वॅगनर आर्मी’चे प्रमुख प्रिगोझिन यांच्या मृत्यूविषयी पुतिन यांनी व्यक्त केले दुःख !

डावीकडून व्लादिमिर पुतिन आणि येवगेनी प्रिगोझिन

मॉस्को (रशिया) – प्रिगोझिन एक प्रतिभावंत उद्योगपती होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या होत्या, हे सत्य असले तरी, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यासाठी मला दु:ख आहे, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘वॅगनर आर्मी’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले. जून २०२३ मध्ये प्रिगोझिन यांनी पुतिन यांच्या विरोधात बंड केले होते. प्रिगोझिन प्रिगोझिन यांच्या समवेत अन्य १० जणांचाही या अपघातात मृत्यू झाला.

पुतिन पुढे म्हणाले की, मी प्रिगोझिन यांना अनेक वर्षांपासून ओळखत होतो. वर्ष १९९० च्या सुमारास ते मला पहिल्यांदा भेटले. त्यांच्याविषयी काही समस्या नक्कीच होत्या. प्रिगोझिन यांनी आयुष्यात काही गंभीर आणि मोठ्या चुका केल्या होत्या; पण अनेक चांगल्या गोष्टीही केल्या. अनेकवेळा मी त्यांना काही कामे सांगितली. वॅगनरने युक्रेनमध्ये जे केले, ते आम्ही विसरू शकत नाही.

प्रिगोझिन यांच्या विमानावर रशियाने क्षेपणास्त्र डागल्याचा अमेरिकेचा संशय

प्रिगोझिन यांच्या मृत्यूवर अमेरिकेच्या एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रिगोझिन यांच्या विमानावर क्षेपणास्त्र डागल्याचा आम्हाला संशय आहे. हे भूमीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र होते आणि ते रशियातील सैन्य तळावरून डागण्यात आले होते. अमेरिकेखेरीज जगातील इतर काही अन्वेषण यंत्रणा या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि लवकरच या प्रकरणात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.