निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २३२
‘शेवग्याचे झाड हे खरोखरच बहुगुणी आहे.
१. शेवग्याच्या शेंगांची, तसेच पानाफुलांचीही भाजी होते. या झाडामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. आठवड्यातून एक दिवस शेवग्याच्या शेंगा, पाने किंवा फुले यांची भाजी आहारामध्ये असल्यास शरिरामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची न्यूनता दूर होण्यास साहाय्य होते.
२. गळू झाल्यास शेवग्याची पाने वाटून त्यांचा लेप करावा. गळू लवकर पिकून फुटून जाते किंवा न पिकता बरे होते.
३. डोळे आलेले असतांना शेवग्याची पाने वाटून त्या पानांचा लगदा डोळे बंद करून डोळ्यांवर ठेवावा आणि डोळ्यांवर पट्टी बांधून विश्रांती घ्यावी. डोळे लवकर बरे होतात.
४. शेवग्याच्या बिया पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जातात.
५. शेवग्याच्या सालीचेही औषधी गुणधर्म आहेत.
हे सर्व औषधी गुणधर्म आपण यथावकाश पाहूच; परंतु आता हे शेवग्याचे महिमामंडन करण्याचा उद्देश ‘सर्वांनी आपल्या घरी न्यूनतम एक शेवग्याचे झाड लावायला हवे’, हे सांगण्यासाठी आहे. आताच्या काळात शेवग्याच्या फांद्या लावल्या, तर त्यांना मुळे फुटतात. आवश्यकतेनुसार कृषीसंबंधी जाणकाराचे मार्गदर्शन घेऊन प्रत्येकाने आपल्या परिसरात शेवग्याचे न्यूनतम एक झाड लावावे. आपत्काळासाठी हे झाड पुष्कळ उपयुक्त आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan