प्रेमभाव आणि स्‍वयंशिस्‍त या गुणांचा संगम असलेले सनातनचे ४६ वे (समष्‍टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) !

‘श्रावण शुक्‍ल पंचमी (२१.८.२०२३) या दिवशी सनातनचे ४६ वे (समष्‍टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय यांचा ८५ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहे.

पू. भगवंत कुमार मेनराय

१. पू. मेनरायकाकांची सेवा मिळाल्‍यावर स्‍वभावदोषांमुळे मनाचा संघर्ष होणे आणि नंतर ‘पू. काकांची खोली, म्‍हणजे ‘लड्डू गोपाल’चे मंदिरच आहे’, असा भाव ठेवून त्‍यांची सेवा करणे

‘२३.१२.२०२२ या दिवसापासून मला पू. भगवंत कुमार मेनरायकाका यांची सेवा करण्‍याची संधी मिळाली. ‘पू. काकांचा स्‍वभाव थोडा रागीट आहे’, असे मी ऐकले होते; परंतु मी दृढ निर्धार करून त्‍यांची सेवा करण्‍याचे ठरवले. आरंभी माझ्‍यातील स्‍वभावदोषांमुळे माझ्‍या मनाचा पुष्‍कळ संघर्ष होत असे. मी कधी कधी ‘मी कसा योग्‍य आहे ?’, याचे स्‍पष्‍टीकरण देत असे; परंतु तरीही मी निश्‍चय केला की, येथून पुढे भावाच्‍या स्‍तरावर प्रयत्न करायचे. तेव्‍हापासून ‘पू. काकांची खोली, म्‍हणजे ‘लड्डू गोपाल’चे मंदिरच आहे’, असा भाव ठेवून मी त्‍यांची सेवा करू लागलो. (पू. मेनरायकाकांच्‍या खोलीत त्‍यांना सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी भेट दिलेली लड्डू गोपालची (श्रीकृष्‍णाची) मूर्ती आहे.) मी त्‍यांच्‍या खोलीच्‍या उंबरठ्याला नमस्‍कार करूनच खोलीत जातो.

श्री. विजय बेंद्रे

२. पू. काकांची सेवा भावाच्‍या स्‍तरावर करण्‍यास आरंभ केल्‍यावर आनंद मिळणे

मी श्री गुरुदेवांचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) नाव घेऊन पू. काकांना आधार देऊन उठवण्‍यास आरंभ केला. तेव्‍हापासून त्‍यांचा देह पुष्‍कळ हलका झाल्‍याचे मला जाणवतेे. पू. काकांचे पाय चेपतांना मी श्री गुरुदेवांचे नाव घेतो. त्‍यामुळे ती सेवा चांगल्‍या प्रकारे होते आणि मला पुष्‍कळ आनंद मिळतो. ‘भावाच्‍या स्‍तरावर संतांची सेवा केल्‍यावरच आपण त्‍यांचे मन जिंकू शकतो आणि आपल्‍याला आनंद मिळतो’, हे मला शिकायला मिळाले.

३. वयाच्‍या ८५ व्‍या वर्षीही वेळेचे काटेकोरपणे पालन करणारे पू. मेनरायकाका !

माझ्‍यामध्‍ये ‘चालढकलपणा करणे’, हा स्‍वभावदोष आहे. त्‍यामुळे मला सेवा पुढे ढकलण्‍याची सवय आहे. याउलट पू. काका वेळेचे पालन काटेकोरपणे करतात. साधकांवर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय होण्‍यासाठी ते साधकांच्‍या समवेत बसून नामजप करतात. या सेवेला जाण्‍यासाठी ते नियोजित वेळेपूर्वीच सिद्धता करून ठेवतात आणि ५ मिनिटे आधी पोचतात. त्‍यामुळे उपाय अगदी वेळेत चालू होतात. यावरून वेळेचे महत्त्व माझ्‍या लक्षात आले, तसेच ‘कोणतीही सेवा करतांना पूर्वसिद्धता करून ठेवली, तर मनावर ताण येत नाही’, हे मला शिकायला मिळाले. पू. काकांनी मला शिकवले, ‘अकस्‍मात् एखादी अडचण येऊ शकते. त्‍यामुळे सेवेसाठी ५ मिनिटे आधीच जायला पाहिजे.’ त्‍यानुसार आता मी स्‍वतःच्‍या सेवांचे नियोजन करतो.

४. साधकाकडून चूक झाल्‍यावर पू. काकांनी रागावून ती चूक लगेच लक्षात आणून देणे आणि साधकाने क्षमायाचना केल्‍यावर पू. काका शांत होणे

पू. काका सैन्‍यात (डिफेंसमध्‍ये) होते. त्‍यामुळे सैन्‍याची शिस्‍त त्‍यांच्‍यामध्‍ये रुजली आहे. माझ्‍या स्‍वभावदोषांमुळे चूक झाल्‍यावर ते मला रागावतात आणि त्‍वरित ती चूक माझ्‍या लक्षात आणून देतात. चूक झाल्‍यावर मी त्‍वरित क्षमायाचना केल्‍यावर ते लगेच शांत होतात आणि मला आनंद मिळतो.

५. पू. काका शिवभक्‍त आहेत. ते मला अधूनमधून शिवाशी संबंधित कथा सांगतात आणि त्‍यावर प्रश्‍नही विचारतात. यावरून माझेही देवतांच्‍या संबंधित वाचन होते. ते मलाही भक्‍तीशी संबंधित कथा सांगायला सांगतात.

६. ‘संतांचे अंतर्मन निर्मळ असून ते सतत वर्तमानात असतात’, हे शिकायला मिळणे 

पू. काकांना जेवढ्या लवकर क्रोध येतो, तेवढ्या लवकर ते शांतही होतात. तेव्‍हा मला वाटते, ‘पू. काका आता रागावले होते आणि आता क्षणात शांत कसे झाले ?’ तेव्‍हा मला दुर्वासऋषींचे स्‍मरण होते. ‘संतांचे अंतर्मन निर्मळ असून ते सतत वर्तमानात रहातात’, हे मला शिकायला मिळते.

७. पू. काकांकडून एखादी चूक झाली, तर ते तत्‍परतेने क्षमा मागतात आणि मी त्‍यांची सेवा चांगली केली, तर त्‍वरित आभारही मानतात. त्‍यामुळे मला आनंद मिळतो आणि माझा उत्‍साहही वाढतो.

८. पू. काकांची तत्‍परता आणि प्रेमभाव !

पू. काकांना शारीरिक आजार आणि वार्धक्‍य यांमुळे त्रास होतो. त्‍यामुळे मला रात्री झोपेतून बर्‍याच वेळा उठावे लागते. एकदा रात्री माझा रक्‍तदाब वाढल्‍यामुळे मला त्रास होत होता. त्‍या वेळी पू. काकांनी त्‍वरित चिकित्‍सालयात संपर्क करून आधुनिक वैद्यांना बोलावले आणि मला तपासायला सांगितले. तेव्‍हापासून माझी सेवा झाल्‍यानंतर ते मला नेहमी म्‍हणतात, ‘‘आता तुमची सेवा झाली आहे. तुम्‍ही विश्रांती घ्‍या.’’

९. अनुभूती

२ मासांपासून मला रक्‍तदाबाचा त्रास होत होता. गुरुदेवांच्‍या कृपेने पू. काकांच्‍या सहवासात आल्‍यापासून मला तो त्रास झाला नाही.

‘श्री गुरुदेव, भगवान श्रीकृष्‍ण आणि भगवान शिव यांच्‍या श्री चरणी मी प्रार्थना करतो, ‘तुमची कृपा आम्‍हा सर्व साधकांवर सदैव राहू दे अन् पू. भगवंत मेनरायकाका यांना दीर्घायुष्‍य लाभू दे.’

– श्री. विजय बेंद्रे (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक