सामाजिक माध्यमांवरून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे परिणाम भोगावेच लागणार ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह, असभ्य आणि अपमानास्पद पोस्ट टाकणार्‍यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. असे लोक क्षमा मागून फौजदारी कारवाईतून सुटू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या वेळी न्यायालयाने तामिळनाडूचे अभिनेते आणि माजी आमदार एस्.व्ही. शेखर यांच्याविरुद्ध प्रविष्ट असलेला खटला रहित करण्यास नकार दिला. वर्ष २०१८ मध्ये शेखर यांनी महिला पत्रकारांच्या संदर्भात फेसबुकवरून आक्षेपार्ह वक्तव्य करणारी पोस्ट प्रसारित केल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

एका महिला पत्रकाराने तामिळनाडूचे तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर ‘त्यांनी माझ्या गालाला स्पर्श केला’, असा आरोप केला होता. महिला पत्रकाराच्या या आरोपासंदर्भात शेखर यांनी फेसबुकद्वारे मत मांडले होते. त्यांच्या पोस्टनंतर बराच वाद झाला. द्रमुकने त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली होती. शेखर यांनी नंतर क्षमा मागितली आणि पोस्ट ‘डिलीट’ही केली, परंतु या पोस्टबद्दल तामिळनाडूमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद करण्यात आले होते.