‘इंस्‍टाग्राम’वर देवतांचे विडंबन करणारी बनावट खाती आणि चालक यांवर कारवाई करा ! – अधिवक्‍ता महेश धांडे

बीड येथे पोलीस अधीक्षकांना निवेदन

बीड, १८ ऑगस्‍ट (वार्ता.) – ‘इंस्‍टाग्राम’ या सामाजिक माध्‍यमाद्वारे ‘ambedkar_the_bap_of_manuwadi’ या ‘अकाऊंट’वर विविध महापुरुष, देवीदेवता, राजकीय नेते यांची विडंबनात्‍मक चित्रे प्रसारित केली जात आहेत. सदर चित्रे समाजामध्‍ये तेढ निर्माण करणारी असून सामाजिक शांतता भंग करणारे आहेत. अत्‍यंत अश्‍लील आणि गलिच्‍छ प्रकारे संरचना (एडीटींग) करून महापुरुष अन् देवता यांचे तोंडवळे जोडलेले आहेत. त्‍यामुळे संबंधित अकाऊंट तात्‍काळ बंद करून सायबर विभागाच्‍या माध्‍यमातून आरोपीवर कठोर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी येथील अधिवक्‍ता महेश धांडे यांनी बीड पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. (महापुरुष आणि देवता यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍यासाठी सक्षम कायदा शासनकर्ते केव्‍हा करणार आहेत ? – संपादक)

निवेदनात म्‍हटले आहे की, संबंधित आरोपीवर तात्‍काळ कठोर कारवाई करणे आवश्‍यक आहे. जेणेकरून पुढील काळात कोणताही समाजकंटक अशा प्रकारे बनावट (फेक) अकाऊंट सिद्ध करून मोठे वाद निर्माण करणार नाही.

कोल्‍हापूर येथे हिंदु एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष दीपक देसाई यांच्‍या तक्रारीवरून गुन्‍हा नोंद !

कोल्‍हापूर – या ‘इंस्‍टाग्राम’ अकाऊंटवरच्‍या विरोधात कोल्‍हापूर येथे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्‍यात हिंदु एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई यांनी तक्रार दिली असून यावर पोलिसांनी २९५ अ आणि ५०५ या कलमान्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्‍वामी उपस्‍थित होते.