हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या साहाय्‍याने रोखली अयोग्‍य राष्‍ट्रध्‍वजांची विक्री !

राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन करत असताना हिंदुत्वनिष्ठ

कोल्‍हापूर – रुईकर वसाहत येथील पोस्‍ट कार्यालयात असलेल्‍या राष्‍ट्रध्‍वजांमध्‍ये असलेले अशोकचक्र हे गोल नसून अंडाकृती असल्‍याचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या लक्षात आले. यानंतर हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्‍वनिष्‍ठांसह संबंधित ठिकाणी जाऊन पहाणी केली असता यातील काही ध्‍वज हे गोल नसल्‍याने ते अयोग्‍य असल्‍याचे लक्षात आले. लगेचच त्‍यांनी ही गोष्‍ट टपाल कार्यालयातील संबंधित व्‍यवस्‍थापकांच्‍या लक्षात आणून देऊन अयोग्‍य राष्‍ट्रध्‍वजांची विक्री थांबवली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्‍वामी, ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदू एकता आंदोलन करवीरतालुकाध्‍यक्ष अमर जाधव, हिंदुत्‍वनिष्‍ठ कैलास (आबा) जाधव उपस्‍थित होते.

या संदर्भात हिंदु जनजागृतीचे समितीचे श्री. शिवानंद स्‍वामी म्‍हणाले, ‘‘या संदर्भात आम्‍ही संबंधित पोलीस ठाण्‍यातही दूरभाष  करून कळवले; मात्र यानंतरही याची विक्री चालूच असल्‍याचे आम्‍हाला कळल्‍यावर अन्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठांसमवेत येऊन आम्‍ही येथे पहाणी केली असता आम्‍हाला अयोग्‍य राष्‍ट्रध्‍वज आढळून आले. अशाच प्रकारे ध्‍वज शहरात अन्‍य काही ठिकाणीही वितरित झाल्‍याच्‍या तक्रारी आम्‍हाला प्राप्‍त झाल्‍या आहेत. तरी असे चुकीचे राष्‍ट्रध्‍वज ज्‍यांनी घरी लावण्‍यासाठी नेले असतील, त्‍यांनी ते लावू नयेत आणि योग्‍य प्रकारचा राष्‍ट्रध्‍वज फडकवावा, असे आवाहन आम्‍हीकरत आहोत.’’

हुपरी येथे प्‍लास्‍टिक ध्‍वज विक्री होत असल्‍याची नितीन काकडे यांची पोलीस ठाण्‍यात तक्रार !

हिंदु जनजागृती समितीच्‍या पुढाकाराने हुपरी येथे प्‍लास्‍टिकचे राष्‍ट्रध्‍वज विक्री न होण्‍यासाठी आणि त्‍या संदर्भात योग्‍य ती कायदेशीर कार्यवाही होण्‍यासाठी हुपरी पोलीस ठाणे, प्रशासन यांना निवेदन देण्‍यात आले होते. यानंतरही लोककल्‍याण ग्राहक संरक्षण संस्‍थेचे शहराध्‍यक्ष श्री. नितीन काकडे यांना असे राष्‍ट्रध्‍वज हुपरी शहरात काही दुकानांत विक्री होत असल्‍याचे लक्षात आले. यानंतर तात्‍काळ श्री. नितीन काकडे यांनी हुपरी शहर पोलीस ठाण्‍यात असे ध्‍वज विक्री होत असल्‍याचे, तसेच काही ठिकाणी विक्री करण्‍यात येणारे राष्‍ट्रध्‍वज योग्‍य प्रकारे न लावल्‍याची लेखी तक्रार प्रविष्‍ट केली. या तक्रारीनंतर पोलीस आणि हुपरी नगरपालिका यांनी व्‍यापार्‍यांना असे ध्‍वज न विकण्‍याच्‍या सूचना केल्‍या. हुपरी नगरपालिकेने १४ ऑगस्‍ट शहरातून गाडीद्वारे प्‍लास्‍टिकचे ध्‍वज न विकण्‍याचे आवाहन केले.