देशासाठी सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी हिंदु धर्म मला धैर्य आणि बळ देतो ! – ऋषी सुनक

ऋषी सुनक व मोरारी बापू

लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी १५ ऑगस्ट या दिवशी केंब्रिज विद्यापिठात चालू असलेल्या मोरारी बापूंच्या रामकथेला उपस्थिती लावली. या वेळी बोलतांना सुनक म्हणाले, ‘‘मी पंतप्रधान म्हणून नाही, तर एक हिंदु म्हणून रामकथेत सहभागी झालो आहे. या वेळी त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणाही दिल्या. ‘देशासाठी सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी हिंदु धर्म मला धैर्य आणि बळ देतो. श्रीराम मला नेहमीच प्रेरणा देतात. ते जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यास, नम्रतेने राज्य करण्यास आणि निःस्वार्थपणे कार्य करण्यास शिकवतात.’’

सुनक पुढे म्हणाले, ‘‘भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित रामकथेच्या कार्यक्रमात सहभागी होणे, हा माझा सन्मान आहे. रामायणासोबतच मी भगवद्गीता आणि हनुमान चालिसा यांचेही वाचन करतो. माझ्या कार्यालयातील पटलावर मी श्री गणेशाची सोन्याची मूर्ती ठेवली आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी ऐकण्याची आणि विचार करण्याची मला श्री गणेश आठवण करून देतो.’’ सुनक मोरारी बापूंना म्हणाले की, तुमच्या आशीर्वादाने मला आपल्या धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे राज्य करायचे आहे.’

संपादकीय भूमिका

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी असे उघडपणे सांगतात ?