अम्‍लपित्ताच्‍या त्रासासाठी जीवनशैलीत पालट करणे अत्‍यावश्‍यक !

सध्‍या बहुतांश लोकांमध्‍ये अम्‍लपित्ताचा त्रास आढळून येतो. छातीत जळजळ व्‍हायला लागली की, बरेच लोक लगेच बाजारात मिळणार्‍या पित्तशामक गोळ्‍या घेऊन मोकळे होतात. एक-दोन दिवस बरे जातात आणि पुन्‍हा तोच त्रास. पित्तशामक गोळ्‍या घेतल्‍याने अम्‍लपित्ताचे ‘जळजळ होणे’ हे लक्षण तात्‍पुरते न्‍यून होते; पण तो त्रास पूर्णपणे काही जात नाही. इथे सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, म्‍हणजे रुग्‍ण आपल्‍या आहार विहारामध्‍ये काहीच पालट करत नाही. त्‍यामुळे अम्‍लपित्ताचा त्रास वारंवार होत रहातो. प्रारंभीला पित्त वाढवणारा आहार घेतल्‍यासच अम्‍लपित्ताचा त्रास होतो. कालांतराने काहीही खाल्ले, तरी अम्‍लपित्त व्‍हायला लागते. उदा. जसे दह्याचे भांडे न धुता आपण त्‍यात दूध घातले, तर ते दूधही जसे लगेच आंबते, तसेच आपण साधा आहार घेतला, तरी अम्‍लपित्त होते आणि नंतर हा त्रास वाढतच जातो.

आज आपण अम्‍लपित्ताचा त्रास होत असल्‍यास काय करावे ? आणि काय करू नये ? याविषयीची माहिती या लेखातून समजून घेणार आहोत.

१. अम्‍लपित्तामध्‍ये दिसणारी लक्षणे

अ. छातीत आणि घशात जळजळणे
आ. डोके दुखणे
इ. आंबट ढेकर येणे
ई. अन्‍न न पचणे
उ. पोट फुगणे
ऊ. क्‍वचित् उलटी अन् जुलाब होणे

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

२. अम्‍लपित्ताचा त्रास वाढण्‍यामागील कारणीभूत आहार, दैनंदिन कृती आणि मानसिक कारणे

सर्वप्रथम अम्‍लपित्ताचा त्रास कोणत्‍या कारणांमुळे होतो ? ते आपण समजून घेऊया. ही कारणे टाळल्‍यास स्‍वतःची या त्रासापासून बर्‍याच अंशी सुटका होते.

२ अ. कारणीभूत आहार

१. आंबट, खारट आणि तिखट चवीचे पदार्थ वारंवार अन् अतीप्रमाणात खाणे. म्‍हणजेच काय, तर विविध प्रकारची लोणची भरपूर प्रमाणात खाणे, आंबट दही-ताक, जळजळीत मसालेदार भाज्‍या, भरपूर तेल घालून केलेल्‍या भाज्‍या, वडापाव, मिरचीचा ठेचा इत्‍यादी. या व्‍यतिरिक्‍त सध्‍याचे मुख्‍य कारण म्‍हणजे चायनीज पदार्थ. त्‍यात अतीप्रमाणात आले, लसूण, हिरवी मिरची असते आणि ‘व्‍हिनेगर’ही घातले जाते. असा पदार्थ हा पित्ताचा भडका उडवणार, यात शंकाच नाही.
२. आंबवलेले पदार्थ जसे की, इडली, डोसा, ढोकळा, पाव, टोस्‍ट खारी हे पदार्थ आंबवून केले जातात. त्‍यामुळे हे पदार्थ वारंवार आहारात असतील, तर पित्त वाढवतात.
३. मांसाहार, दारू, सिगारेट यांसारखे व्‍यसन हेही पित्त वाढवतात.
४. भूक नसतांना वरचेवर खाल्‍ल्‍यासही अम्‍लपित्त होते.
५. शिळे अन्‍न वारंवार खाणे.
६. चहा घेणे.

२ आ. कारणीभूत दैनंदिन कृती

१. वेळेत शौचास न जाणे. सकाळी कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर पडायचे असल्‍यामुळे आवरून निघायची घाई असते, अशा वेळी शौचाला जाण्‍याचा वेग येऊन सुद्धा ‘वेळ नाही’ म्‍हणून जाण्‍याचे टाळले जाते. अशा नैसर्गिक वेगांचे धारण करणे अनेक रोगांना निमंत्रण असते.
२. जेवल्‍यानंतर लगेच झोपणे.
३. जेवण करतांना वरचेवर पाणी पिणे.
४. रात्री जागरण करणे.

 २ इ. मानसिक कारणे

१. रागीट व्‍यक्‍तींना अम्‍लपित्ताचा त्रास होऊ शकतो.
२. मानसिक ताण वा काळजी असेल, तर प्रथम भूक मंदावते आणि नंतर अम्‍लपित्ताचा त्रास चालू होतो.

२ ई. हवामान

आपण कोणत्‍या प्रदेशात रहातो आणि कसा आहार घेतो, हा भागही समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. दमट हवामान, जिथे पाऊस पुष्‍कळ पडतो, असा प्रदेशही अम्‍लपित्ताचा त्रास होण्‍यास कारणीभूत ठरतो. आपण अशा प्रदेशात रहात असू, तर आपल्‍याला आहारावर फार नियंत्रण आणावे लागते. अशा प्रदेशात आपण वर नमूद केलेले पदार्थ थोडे जरी खाल्ले, तरी लवकर अम्‍लपित्ताचा त्रास वाढू शकतो. याउलट कोरड्या हवामानाच्‍या प्रदेशात पचनशक्‍ती चांगली रहात असल्‍याने लगेच त्रास होत नाही; पण खाण्‍यात मसालेदार आणि तत्‍सम पदार्थांची वारंवारता असल्‍याने कोरड्या हवामानात रहाणार्‍या लोकांनाही अम्‍लपित्त हे होतेच.

३. अम्‍लपित्ताचा त्रास असणार्‍यांसाठी पथ्‍यकर आहार

अ. आपल्‍या आहारात गव्‍हाचे फुलके, भाकरी, जुन्‍या तांदळाचा भात यांचा समावेश करावा.
आ. भाज्‍यांमध्‍ये दुधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी, पडवळ, कोबी, घोसाळी, तांदुळजा या भाज्‍या पथ्‍यकर आहेत. वारंवार कारले, मेथी, शेवगा या भाज्‍या खाण्‍याचे टाळावे. आमटी करतांना ती चिंचऐवजी कोकम घालून करावी.
इ. गव्‍हाची लापशी, तांदळाची उकड, मूग – तांदूळ यांची खिचडी, ज्‍वारीच्‍या पिठाचे धिरडे, असे पदार्थ खावेत.
ई. फळांमध्‍ये द्राक्ष, अंजीर, डाळिंब, आवळा, सफरचंद, केळी, नारळ, खजूर ही फळे खाऊ शकतो.
उ. दूध, तूप, लोणी यांचा समावेश करावा. दही, ताक टाळावे.
ऊ. चटणी करतांना कोथिंबीर, खोबरे, धने-जिरे घालून करावी.
ए. स्‍वयंपाक करतांना अल्‍प तेल वापरावे.
ऐ. खाऊ म्‍हणून साळीच्‍या लाह्यांचा अल्‍प तेल घालून केलेला चिवडा, राजगिर्‍याच्‍या वड्या किंवा लाडू, नारळाच्‍या वड्या असे खावे. शेव, चिवडा, फरसाण, चिप्‍स असे पदार्थ खाऊ नयेत.

४. अम्‍लपित्तासाठी काही घरगुती उपाय

अ. सकाळी अनशापोटी पोटी गुलकंद, मोरावळा खावे.
आ. तुळशीचे बी रात्री एका वाटीत पाण्‍यात भिजवून ते सकाळी अनशापोटी खावे आणि पाणी प्‍यावे.
इ. रात्री पेलाभर पाण्‍यात धने-जिरे पूड प्रत्‍येकी अर्धा चमचा भिजत घालावे आणि सकाळी ते पाणी गाळून अनशापोटी घ्‍यावे. चवीला खडीसाखर घालू शकतो.
ई. ताजा डाळिंबाचा किंवा आवळ्‍याचा रस घ्‍यावा.

– वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर, पुणे (१३.८.२०२३)

♦ घरगुती उपाय करूनही अम्‍लपित्ताचा त्रास न्‍यून न झाल्‍यास वैद्यांच्‍या सल्‍ल्‍याने औषधोपचार घेणे महत्त्वाचे आहे. ♦