अनेक संकटांतून गुरुकृपेने जीवदान मिळालेल्‍या आणि चिकाटीने साधना करणार्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेल्‍या सौ. रेखा माणगावकर यांचा साधनाप्रवास !

सौ. रेखा माणगावकर

१. बालपण

‘माझे बालपण फार कष्‍टात गेले. आम्‍ही ५ भावंडे होतो. माझ्‍या वयाच्‍या ९ व्‍या वर्षी माझे वडील वारले. ते हयात असतांना २ बहिणींचे विवाह झाले होते. घरची परिस्‍थिती बिकट होती. दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण होते; म्‍हणून मी लहान मुलींची शिकवणी घेऊन माझे शिक्षण चालू ठेवले होते. मी घरातील सर्व कामे करून शाळा आणि त्‍यानंतर पुढे महाविद्यालयातही चालत जात असे. आम्‍हाला थोरल्‍या बहिणीकडून थोडे साहाय्‍य मिळत होते; म्‍हणून घरातील खर्च भागत होता. लहानपणी मला २ वेळा विषमज्‍वर (टायफॉईड) झाला. ‘त्‍यातून मी जगणे कठीण आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते; परंतु ईश्‍वरी कृपेने मी बरी झाले.

२. डोक्‍यावर नारळ पडूनही दुखापत न होणे, त्‍यानंतर देवीने आशीर्वाद दिल्‍यामुळे एका मासात विवाह जुळणे

माझा विवाह जुळण्‍यापूर्वी एक घटना घटली. थोरल्‍या बहिणीच्‍या घरी विहिरीजवळ ४० फूट उंचीचे नारळाचे झाड होते. एकदा मी विहिरीतून पाणी काढून हंडा भरत होते. अकस्‍मात् एक नारळ माझ्‍या डोक्‍यावर पडला; परंतु ईश्‍वरकृपेने मला कोणतीही दुखापत झाली नाही. त्‍यानंतर मला एक स्‍वप्‍न पडलेे. स्‍वप्‍नामध्‍ये देवीने तिचा मुकुट माझ्‍या डोक्‍यावर घालून मला आशीर्वाद दिला. त्‍यामुळे एका मासात माझा विवाह निश्‍चित झाला.

३. पूर्वी ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांच्‍या संप्रदायानुसार साधना करणे आणि त्‍यानंतर सनातन संस्‍थेच्‍या साधकांचे प्रवचन ऐकल्‍यावर कुलदेवतेचा नामजप करणे

अनेक वर्षांपासून आम्‍ही कुटुंबीय ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांच्‍या संप्रदायानुसार साधना करत होतो. त्‍या वेळी आम्‍ही अलोरे येथे रहात होतो. एप्रिल १९९४ मध्‍ये चिपळूण येथील सनातन संस्‍थेच्‍या साधकांनी अलोरे येथील शासकीय वसाहतीत प्रवचन आयोजित केले होते. या प्रवचनाला आम्‍ही सर्व कुटुंबीय उपस्‍थित होतो. यानंतर आम्‍ही कुलदेवतेचा नामजप चालू केला.

४. कुलदेवता श्री महालक्ष्मीच्‍या आशीर्वादाने यजमान आजारपणातून वाचणे

काही दिवसांनंतर माझे यजमान आजारी पडले. त्‍यांच्‍या उपचारासाठी आम्‍ही सकाळी १० वाजता चिपळूण येथील आधुनिक वैद्यांकडे गेलो होतो. त्‍यांनी ‘यजमानांचा आजार गंभीर स्‍वरूपाचा असल्‍याने त्‍यांना २ घंट्यांच्‍या आत अन्‍यत्र उपचारासाठी रुग्‍णालयात भरती करावे’, असे सुचवले. त्‍यानंतर शासकीय वैद्यांच्‍या समवेत चर्चा करून यजमानांना कराड येथील कृष्‍णा रुग्‍णालयात भरती करण्‍याचे ठरवले. त्‍या दिवशी शनिवार आणि दुसर्‍या दिवशी रविवार असल्‍याने त्‍यांच्‍यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्‍या रात्री माझ्‍या स्‍वप्‍नात आमची कुलदेवता श्री महालक्ष्मी आली आणि तिने ‘यजमानांना काही झाले नाही आणि ते लवकरच बरे होतील’, असे मला सांगितले. त्‍यामुळे मला धीर आला. सोमवारपासून वेगवेगळ्‍या चाचण्‍या करून उपचार चालू झाले आणि एका आठवड्यानंतर आम्‍ही अलोरे येथील आमच्‍या घरी परतलो.

५. ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांनी स्‍वप्‍नात येऊन सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करण्‍यास सांगणे

एका रात्री ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज माझ्‍या स्‍वप्‍नात येऊन म्‍हणाले, ‘यापुढे तुम्‍ही सर्व कुटुंंबीय सनातन संस्‍थेच्‍या वतीने शिकवण्‍यात येत असलेली साधना करू शकता.’ त्‍यानुसार आमचा प्रत्‍यक्ष साधनेला आरंभ झाला. १९९५ मध्‍ये अलोरे येथे शासकीय वसाहतीत सनातन संस्‍थेचा सत्‍संग चालू झाला. सत्‍संग आणि अभ्‍यासवर्ग घेण्‍यासाठी विविध ठिकाणांहून साधक येत होते.

६. कुडाळ येथील प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या गुरुपौर्णिमेला जाता न येणे, प.पू. महाराजांच्‍या दर्शनाची इच्‍छा अपूर्ण राहिल्‍याची खंत वाटणे आणि त्‍यानंतर प.पू. महाराजांनी त्‍यांच्‍या देहत्‍यागाच्‍या रात्री स्‍वप्‍नात येऊन दर्शन देणे

जुलै १९९५ मध्‍ये कुडाळ, सिंधुदुर्ग येथे संस्‍था स्‍तरावर प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या गुरुपौर्णिमेचे आयोजन केले होते. मला तेथे जाण्‍याची फार इच्‍छा होती; परंतु माझा मुलगा वैभव लहान असल्‍यामुळे मी तेथे जाऊ शकले नाही. केवळ यजमान जाऊन आले. ‘प.पू. भक्‍तराज महाराज यांचे दर्शन घेण्‍याची इच्‍छा अपूर्ण राहिली’, याची मला खंत वाटली. त्‍यानंतर प.पू. भक्‍तराज महाराज यांनी त्‍यांच्‍या देहत्‍यागाच्‍या दिवशी पहाटे माझ्‍या स्‍वप्‍नात येऊन मला दर्शन दिले आणि माझ्‍याकडून पाद्यपूजा करवून घेऊन चरणांवर तुळस अर्पण करण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे मी केले. त्‍यानंतर ‘प.पू. भक्‍तराज महाराज यांनी देहत्‍याग केला’, असा सकाळी ६ वाजता मला दूरध्‍वनीद्वारे निरोप मिळाला. त्‍यांचे दर्शन घेण्‍याची माझी इच्‍छा अशा प्रकारे त्‍यांनी पूर्ण केली.

७. वर्ष २००१ ते २००५ पर्यंत केलेली साधना

वर्ष २००१ मध्‍ये यजमानांच्‍या सेवानिवृत्तीनंतर कर्नाटकातील बेळगाव, बेंगळुरू, मंगळुरू, मुल्‍की आणि धारवाड येथे साधना करण्‍याची संधी मिळाली.

८. झालेले विविध त्रास

८ अ. वर्ष २००४ मध्‍ये माझ्‍या पित्ताशयामध्‍ये १५ ते २० खडे झाल्‍यामुळे २ वर्षांपासून पोट दुखत होते. तेव्‍हा शस्‍त्रक्रिया करून पित्ताशय काढावे लागले.

८ आ. पायाची शस्‍त्रक्रिया करावी लागणे : वर्ष २००५ मध्‍ये मुल्‍की येथे मी कपडे वाळत घालतांना स्‍टुलावरून खाली पडले. त्‍यामुळे माझ्‍या पायाला दुखापत झाली. तेव्‍हा रक्‍त साकळल्‍यामुळे पायाची शस्‍त्रक्रिया करावी लागली.

८ इ. एका आधुनिक वैद्यांनी कर्करोग झाला असल्‍याचे सांगितले, त्‍यानंतर स्‍त्रीरोगतज्ञांनी कर्करोग नसल्‍याचे सांगणे : नोव्‍हेंबर २००६ मध्‍ये माझी मुलगी सौ. श्रेया गांवकर (पूर्वाश्रमीची वर्षा माणगावकर) हिच्‍या साखरपुड्याच्‍या आदल्‍या दिवशी धारवाड येथील एका आधुनिक वैद्याने ‘तुम्‍हाला कर्करोग झाला आहे; म्‍हणून तुम्‍ही त्‍वरित रुग्‍णालयात भरती व्‍हा’, असे मला सांगितले. परंतु दुसर्‍या दिवशी मुलीचा साखरपुडा असल्‍यामुळे मी रुग्‍णालयात गेले नाही. तेव्‍हा माझ्‍या मनात कर्करोगाचा विचार घोंघावत होता. त्‍यानंतर मी एका स्‍त्रीरोग तज्ञांकडे कर्करोगाविषयी निश्‍चिती करण्‍यासाठी गेल्‍यावर त्‍यांनी ‘तुम्‍हाला कर्करोग झालेला नाही’, असे सांगितले.

८ ई. अंघोळीसाठी पाणी गरम करतांना ‘हिटर’चा स्‍फोट होऊन चेहरा भाजणे आणि डोळ्‍याला दुखापत होणे, तरीही गुरुकृपेने त्‍यातून रक्षण होणे अन् मुलीचा साखरपुडा सुरळितपणे पार पडणे, नंतर प.पू. गुरुदेेवांनी ‘यापुढे काही होणार नाही’, असे सांगून आश्‍वस्‍त करणे : मुलीच्‍या साखरपुड्याच्‍या दिवशी मी अंघोळीसाठी पाणी गरम करण्‍यासाठी एका बालदीत पाणी घेतले; परंतु पाणी तापवण्‍याचा हिटर (इमर्सन वॉटर हिटर, पाणी गरम करण्‍याचे उपकरण) बालदीत न घालता मी तो बाहेर असतांनाच त्‍याची कळ (स्‍वीच) चालू केली. त्‍यामुळे त्‍याचा स्‍फोट झाला आणि त्‍यातील गरम पावडर माझ्‍या चेहर्‍यावर, तसेच डोळ्‍यावर उडाली. माझा चेहरा भाजला आणि डोळ्‍याला दुखापत झाली. तेव्‍हा कार्यक्रमानिमित्त घराच्‍या हॉलमध्‍ये सत्‍संगाचा फलक बांधला होता. मी त्‍याच्‍यासमोर जाऊन उभी राहिले. त्‍या सत्‍संगाच्‍या फलकाने मला आध्‍यात्मिक लाभ मिळाल्‍याची जाणीव झाली. त्‍यानंतर मी नेत्रतज्ञांकडे जाऊन डोळे तपासून घेतले. तेव्‍हा त्‍यांनी ‘डोळ्‍याला झालेली दुखापत अंतर्पटलापर्यंत गेली नसून गंभीर स्‍वरूपाची नाही’, असे मला सांगितले. या प्रसंगामध्‍ये ‘प.पू. गुरुदेवांनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) माझे रक्षण केले’, याची मला जाणीव झाली. त्‍याच क्षणी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली. त्‍यानंतर गुरुकृपेने साखरपुड्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडला.

साखरपुड्यानंतर मुलीने प.पू. गुरुदेवांना माझ्‍या अपघाताविषयी सांगितल्‍यावर त्‍यांनी तिला ‘तुझ्‍या आईला पुढेे काही त्रास होणार नाही’, असे सांगून आश्‍वस्‍त केले.

९. झालेले विविध अपघात

९ अ. चारचाकीचा गंभीर अपघात होऊनही प.पू. गुरुदेवांनी मोठा अनर्थ घडण्‍यापासून वाचवणे : एकदा माहेरच्‍या जमिनीसंदर्भातील कामासाठी माझी थोरली बहीण आणि तिचे यजमान यांच्‍यासमवेत मी माहेरी गेले होते. ते काम संपवून आम्‍ही सर्व जण चारचाकीतून धारवाड येथील रहात्‍या घरी परत येत होतो. तेव्‍हा वाहनचालकाला अकस्‍मात् चक्‍कर येऊन चारचाकी विद्युत् खांबासहित एका घराच्‍या भिंतीला धडकली. यामुळे चालकाच्‍या आणि माझ्‍या डोक्‍याला मार लागून जखम झाली. माझ्‍या डोक्‍याला १४ टाके आणि चालकाच्‍या डोक्‍याला ४ टाके घालावे लागले. या वेळी गंभीर अपघाताऐवजी थोडक्‍यात निभावले. याप्रसंगी प.पू. गुरुदेवांनी मोठा अनर्थ घडण्‍यापासून आम्‍हाला वाचवले; म्‍हणून त्‍याच क्षणी मी त्‍यांच्‍या चरणी पुष्‍कळ कृतज्ञता अर्पण केली.

९ आ. बसमधून प्रवास करतांना झालेल्‍या अपघातातून प.पू. गुरुदेवांनी वाचवणे : जुलै २०१८ मध्‍ये आमचे कुटुंब धारवाडहून बांदोडा, गोवा येथे स्‍थलांतरित झाले. नोव्‍हेंबर २०१८ मध्‍ये काही कामानिमित्त मी यजमानासमवेत बेळगाव येथे गेले होते. एके दिवशी माझे यजमान निवृत्ती वेतनासंदर्भातील हयातीचा दाखला (लाईफ सर्टिफिकेट) देण्‍यासाठी दुचाकी घेऊन बेळगाव येथील अधिकोषाकडे जात असतांना दुचाकीसमोर कुत्रे आडवे येऊन अपघात झाला. यामुळे यजमानांच्‍या डाव्‍या हाताच्‍या दोन बोटांचा अस्‍थिभंग झाला. यासाठी शस्‍त्रक्रिया करावी लागली. आधुनिक वैद्यांनी एका मासानंतर तपासणीसाठी बोलावले होते; म्‍हणून एका मासाने आम्‍ही उभयता बसमधून फोंडा येथून बेळगावकडे जात होतो. फोंड्याहून २० कि.मी. अंतरावरील धारबांदोडा येथे आम्‍ही प्रवास करत असलेली बस आणि एक चारचाकी यांची समोरासमोर टक्‍कर होऊन चारचाकीचा चक्‍काचूर झाला. मी यजमानांना पुढच्‍या आसनावर बसण्‍यासाठी आग्रह करत होते; परंतु यजमानांनी नकार दिल्‍यामुळे आम्‍ही मधल्‍या आसनावर बसून प्रवास करत होतो. यामुळे या अपघातात आम्‍हाला कोणतीही दुखापत न होता आम्‍ही वाचलो. या वेळी प.पू. गुरुदेवांनीच आमचे रक्षण केले; म्‍हणून त्‍याच क्षणी आम्‍ही त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

वरील सर्व प्रसंगामध्‍ये प.पू. गुरुदेवांनी माझे रक्षण केले आणि माझ्‍याकडून साधना करवून घेऊन माझी आध्‍यात्मिक प्रगती करून घेतली. याबद्दल प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी पुन्‍हा एकदा कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करत आहे.’

– सौ. रेखा माणगावकर (वय ६२ वर्षे), नागेशी, फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक