‘जसा प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साजरा केला होता, तसा अल्पशा प्रमाणात का होईना, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव होणार आहे. त्यात मला सेवाही मिळणार आहे’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद आणि उत्साह जाणवत होता, तसेच कृतज्ञताही वाटत होती.
१. ब्रह्मोत्सवाच्या संदर्भातील सेवा करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. सेवा करण्यासाठी साधकसंख्या आणि वेळ अल्प असणे अन् त्या वेळी ‘गुरुदेवच सेवा करून घेत आहेत’, असे जाणवणे : ब्रह्मोत्सवाच्या वेळी माझ्याकडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना ब्रह्मोत्सव बघायला पाठवण्याच्या नियोजनाची सेवा होती. साधकांना ब्रह्मोत्सवाला पाठवायच्या सेवेची व्याप्ती बरीच मोठी होती. या सेवेसाठी उपलब्ध असणार्या साधकांची संख्या आणि वेळ अल्प होता. मी एखाद्या सेवेत एकटी असल्यास प्रत्येक वेळी ‘मला सेवा करायला जमणार नाही’, असा माझ्या मनातील विचार आणि चुकांची भीती, यांमुळे मी सेवेत माघार घेत असे. या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच माझ्याकडून सर्व सेवा करून घेत आहेत’, असे मला जाणवत होते.
१ आ. रात्रभर जागून सेवा करूनही मला थकवा आला नाही. त्या वेळी मला पुष्कळ ऊर्जा जाणवत होती. मला पूर्णवेळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवत होते.
१ इ. सेवा करतांना ताण आल्यावर गुरुदेवांचा धावा चालू होणे आणि पुढची सेवा पूर्ण होणे : जेव्हा सेवा करतांना मला ताण जाणवायला आरंभ व्हायचा, तेव्हा लगेच माझ्या मनाला त्याची जाणीव व्हायची आणि माझ्याकडून गुरुदेवांचा धावा चालू व्हायचा. त्यामुळे माझी पुढची सेवा पूर्ण होत असे. ही सेवा करतांना मला प्रथमच असे अनुभवता आले.
२. ब्रह्मोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती
२ अ. ‘मैदानात प्रवेश करण्यासाठीची ४ प्रवेशद्वारे ही ४ पुरुषार्थांची प्रतिके आहेत आणि ती पार केल्याने साधकांना श्रीविष्णूचे दर्शन मिळून एकप्रकारे मोक्ष मिळाला’, असे वाटणे : कार्यक्रमस्थळी पोचल्यावर मला तेथे पुष्कळ श्रीविष्णुतत्त्व जाणवत होते. ‘मैदानात प्रवेश करण्यासाठी ४ प्रवेशद्वारे असून ती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्रतिके आहेत. ही द्वारे पार केल्याने आज सर्व साधकांना श्रीविष्णूचे दर्शन मिळून एकप्रकारे मोक्ष मिळाला’, असे वाटून माझी पुष्कळ भावजागृती झाली.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली रथारूढ होऊन परिक्रमा करत असतांना ‘ती ब्रह्मांडांची परिक्रमा असून त्यामुळे सर्व ब्रह्मांडांची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवले.
२ इ. गुरुमाऊलींनी रथाच्या परिक्रमेच्या वेळी दृष्टीक्षेपाद्वारे साधकांचे त्रास दूर करणे आणि साधकांच्या अंतरात भावभक्तीचे जागरण करणेे : सध्या काही वर्षांपासून साधकांची मायेची ओढ वाढली आहे. अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे असे होत आहे. परिक्रमेच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींची दृष्टी साधकांवर पडली. तेव्हा त्यांनी साधकांचे हे त्रास दूर करून साधकांच्या अंतरात भावभक्तीचे जागरण केले आणि त्यांनी त्यांच्या दृष्टीक्षेपाद्वारे साधकांचा उद्धार केला. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या दृष्टीक्षेपामुळे प्रत्येक साधकाच्या डोळ्यांतून भावाश्रू आले’, असे मला जाणवले.
२ ई. जे साधक स्थुलातून येऊ शकले नाहीत, त्यांनाही ‘गुरुदेवांनी ऊर्जा दिली’, असे मला जाणवले.
२ उ. कार्यक्रमाच्या वेळी मला भाव, चैतन्य, आनंद आणि शांती अनुभवता येत होती. एकाच वेळी हे सर्वच घटक अनुभवण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.
२ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींना बघून प्रथमच माझी पुष्कळ भावजागृती झाली. ही भावजागृती अखंड होत होती. माझी ही स्थिती कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत टिकून होती.
३. वरील लिखाण करतांना त्रास होणे आणि चंडीयागाच्या ठिकाणी नामजपादी उपायांना बसल्यावर लिखाण पूर्ण करता येणे
वरील लिखाण करायला लागल्यावर मला पुष्कळ त्रास होऊ लागला. रथोत्सवानंतर रामनाथी आश्रमात २ दिवस चंडी याग होता. मी या दोन्ही दिवशी यज्ञाच्या ठिकाणी नामजपादी उपायांना बसले. त्यानंतर मी हे लिखाण पूर्ण करू शकले.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, ‘आपल्या अमूल्य कृपेमुळेच मला हे सर्व अनुभवता आले’, याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– कु. मयुरी डगवार, फोंडा, गोवा. (१७.५.२०२३)
|