सुराज्य निर्मितीमधील प्रमुख अडथळा असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हवा !

प्रतिकात्मक चित्र

भारताला ‘रामराज्य’, सम्राट युधिष्ठिर यांचे ‘धर्मराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ या आदर्श राजकीय व्यवस्थांची परंपरा आहे. असे असूनही त्यांच्या तुलनेत आजची राजकीय व्यवस्था असलेली भारतीय लोकशाही निरर्थक ठरेल कि काय ? असे म्हणण्याची पाळी आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारण काही प्रमाणात केवळ मदांध लोकांचे सत्ताकारण बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘एखाद्या देशाची राज्यघटना कितीही चांगली असले, तरी ते राबवणार्‍या व्यक्तीच जर असक्षम असतील, तर लोकशाही निरर्थक ठरते.’ त्यामुळे केवळ राज्यघटना आणि लोकशाही चांगली असून उपयोग नाही, तर ती ज्यांच्या हातात आहे, ते राजकारणी निःस्वार्थी, प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यपरायण असायला हवेत.

आज राज्यव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, न्यायव्यवस्था, पोलीस, प्रशासन, कृषी, संरक्षण आणि अर्थ अशा सर्वच व्यवस्थांमध्ये भ्रष्टाचार, अकार्यक्षमता अन् अधिकारशाही यांचे प्रस्थ वाढलेले दिसून येत आहे. प्रत्येकालाच याचा अनुभव प्रतिदिन येत असतो. सर्वांच्या मनात याविषयी चीड असते; मात्र ‘आपल्याकडे अन्य पर्याय नाही’, ‘आपले काम त्वरित व्हायला हवे’ किंवा ‘मी एकटा या व्यवस्थेशी कसा लढणार ?’, अशा विचारांनी आपणही याच भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनतो. मग ‘रामराज्य’ आणि ‘शिवशाही’ केवळ कथांमधून सांगण्यासाठी राहील. या दृष्टीनेच केवळ राजकीय व्यवस्थेवर टीका करून न थांबता, ‘हे राष्ट्र माझे आहे, ही माझी मातृभूमी आहे आणि या समाजाचा मी एक घटक आहे’, या दृष्टीने आपल्याला या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.

संपादकीय भूमिका :

एखाद्या देशाची राज्यघटना कितीही चांगली असली तरी ते राबवणार्‍या व्यक्तीच जर असक्षम असतील, तर लोकशाही निरर्थक ठरते.