सांगली, १ मार्च (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका पाणीपुरवठा विभागातील भ्रष्ट कर्मचारी नितीन आळंदे यांना बडतर्फ करावे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी अन् त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करून व्याजासह पैसे वसूल करावेत, याचसमवेत ग्राहक भावेश शहा यांच्यावर कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी २५ फेब्रुवारीपासून महापालिकेसमोर आमरण उपोषणास बसलेले शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री. विनायक येडके यांनी महापालिकेचे उपायुक्त श्री. वैभव साबळे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर २८ फेब्रुवारी या दिवशी आमरण उपोषण मागे घेतले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री. रमाकांत कार्वेकर, महिला आघाडी प्रमुख राणीताई कमलाकर, सर्वश्री सतीश पाटील, सुशांत कोळेकर, आकाश शिंदे, शिवाजी भोसले आदी या उपोषणास बसले होते. (संबंधित भ्रष्टाचार्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना उपोषण करायला लावणार्या प्रशासनातील अधिकार्यांवरही कारवाई हवी ! – संपादक)
याविषयी श्री. विनायक येडके म्हणाले की, आम्ही वारंवार पाणीपुरवठा विभागामध्ये भ्रष्टाचार करणार्यांच्या विरोधात बर्याच वेळा पत्राद्वारे आणि समक्ष भेटून महापालिका प्रशासनाला माहिती दिली होती. २८ मार्च २०२४ या दिवशी स्वतः भावेश शहा यांच्या घरी जाऊन अनधिकृत पाणीजोडणी, संबंधित पाणीपुरवठा अधिकारी सचिन सागावकर आणि त्यांच्या पथकाला पकडून दिले होते. त्यानंतर २ एप्रिलपासून बरीच निदर्शने आणि आंदोलने केली. १६ मे २०२४ या दिवशी उपोषणास बसलो असता नाममात्र कारवाई म्हणून महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी नितीन आळंदे यांना निलंबित केले होते. यामध्ये पाणीजोडणी घेणारा आणि देणारा, तसेच त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी हे सर्व दोषी आहेत. या प्रकरणाचे सर्व पुरावे दिले आहेत. तरीही महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही आमरण उपोषणास बसलो होतो.
महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी श्री. विनायक येडके यांना एक पत्र दिले असून या पत्रात त्यांनी श्री. येडके यांनी दिलेल्या निवेदनानुसार येत्या ८ ते १० दिवसांत संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, तसेच चौकशीच्या वेळी तक्रारदार म्हणून श्री. येडके यांना समक्ष उपस्थित रहाण्याची संधी दिली जाईल, अशा आशयाचे पत्र देऊन आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार श्री. येडके यांनी त्यांचे साथीदार यांनी उपोषण मागे घेतले आहे.