अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने…
यापूर्वी महाराष्ट्रात बोगस (खोटे) डॉक्टर सापडत होते; मात्र राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचे साठेही आढळले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत या प्रकरणी विरोधक आक्रमक झाल्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणातील दोषी अधिकार्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

महायुती सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम हे अन्न आणि औषध मंत्री असतांनाच्या काळात हा घोटाळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारसाठी ही स्थिती अतिशय लाजिरवाणी स्थिती आहे. या बनावट औषधांमध्ये औषधाचे मूळ घटकच नव्हते. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार अतिशय भयंकर आहे. एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला ही औषधे कुणीतरी दिली असतील; परंतु ती बनावट असल्यामुळे त्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी रुग्णाची स्थिती अधिकच गंभीर झाली असेल, तर हा गांभीर्याचा विषय आहे. यामुळे काही रुग्णांना प्राणही गमवावा लागल्याची शक्यताही नाकारता येत नाही. आतापर्यंत विविध शासकीय विभागांमध्ये होत असलेले भ्रष्टाचार सर्वश्रुत आहेत. आरोग्य विभागात रुग्णालयांमध्ये यंत्रांच्या खरेदीतील भ्रष्टाचार यापूर्वी बाहेर आले आहेत; मात्र रुग्णांना देण्यात येणारी औषधेच बनावट असणे, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर वेळीच कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात बनावट औषधांचा प्रकार अनेकांच्या जिवाशी खेळणारा ठरेल.
या प्रकरणात राज्यातील ८ शासकीय रुग्णालयांतील साठे बनावट असल्याचे पडताळणीत आढळले; मात्र अद्यापही साडेसात सहस्र नमुन्यांचे अहवाल येणे प्रलंबित आहेत. या पडताळणीला होत असलेला विलंब हा निश्चितच संशयास्पद आहे. उत्तराखंड राज्यातील ‘मिरीस्टल फॉमुलेशन’, या बनावट आस्थापनाकडून या औषधांची खरेदी करण्यात आली. मुळात या नावाचे कोणतेही आस्थापन अस्तित्वात नसल्याचे अन्वेषणात उघड झाले. महाराष्ट्रातील ज्या औषध पुरवठा आस्थापनांनी ही बनावट औषधे खरेदी केली, त्या औषधनिर्मिती आणि उत्पादक यांच्यावर विविध ८ पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले; मात्र ज्या शासकीय अधिकार्यांनी औषधे खरेदीचा आदेश दिला, त्यांवर अद्यापही कारवाई झालेली नाही. खरेदी करण्यात आलेली औषधे योग्य आहेत कि नाहीत ? याची पडताळणी संबंधित शासकीय अधिकार्यांनी करणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. नागरिकांच्या जिवाशी खेळणारा हा प्रकार सरकारने गांभीर्याने घेऊन दोषींवर वेळीच कठोर कारवाई करावी.
– श्री. प्रीतम नाचणकर, प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई.