सलग ४५० वर्षे पोर्तुगीज सत्तेच्या खांद्याला खांदा लावून गोव्यातील धर्मांतरित नवख्रिस्ती आणि हिंदूंना ‘इन्क्विझिशन’द्वारे (धर्माच्छळाद्वारे) जिवंत जाळण्यापासून ते राक्षसी मार्गांनी छळ करण्याच्या ‘होली’ (पवित्र) क्रूरकर्मात पुढाकार घेऊन संपूर्ण साथ दिलेल्या चर्च संस्थेने गोवामुक्तीनंतरही स्वतःची जुनी भूमिका सोडलेली नाही’, याचे संकेत जसे अलीकडच्या काळात, चर्चच्या उत्तरदायी पाद्य्रांच्या आक्षेपार्ह जाहीर वर्तनावरून मिळत आहेत, तसेच ते प्रत्यक्ष चर्च (आर्चडायोसिस)चे मुखपत्र असलेल्या ‘रेनोव्हासाव’च्या ऑगस्ट २०२३ च्या पहिल्या पाक्षिक अंकातून ध्वनित झालेले आहेत. ‘एकंदरच हे प्रकरण केवळ गोमंतकीय हिंदु-ख्रिस्ती बांधवांना चिथावणी देणार्या भयानक ‘द्विराष्ट्रवादाची’ बीजपेरणी करण्यापुरते मर्यादित नसून हिंदूंविषयी ख्रिस्ती धर्मियांच्या मनात प्रचंड विष कालवून गोव्यातील धार्मिक संतुलन आणि सलोखा बिघडवणारे आहे’, असे हिंदू रक्षा महाआघाडी, गोवाचे म्हणणे आहे. या सर्व प्रकरणाचा महाआघाडी तीव्र निषेध करत आहे आणि ‘सरकारने एकूण प्रकरण अन् घटनाक्रम यांची गंभीर नोंद घ्यावी’, अशी मागणी करत आहे.
जनतेच्या माहितीसाठी १ ते १५ ऑगस्ट २०२३ च्या ‘रेनोव्हासाव’ पाक्षिकामधील मुद्दे आणि चर्चच्या उत्तरदायी पाद्रींच्या आक्षेपार्ह वर्तनाच्या नजीकच्या काळात सलग घटनांचा उल्लेख करणे भाग आहे.
१. ‘रेनोव्हासाव’ पाक्षिकामधील चिथावणीखोर मुद्दे
अ. मणीपूरनंतर मानवी जीविताच्या सर्वंकष विध्वंसाचे (होलोकॉस्टचे) गोवा राज्य लक्ष्य बनण्याची संभावना आहे !
आ. ‘पोर्तुगीज वसाहतवादाच्या खाणाखुणा नष्ट करणार’ आणि ‘पोर्तुगिजांनी उद़्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करणार’, या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या २ घोषणा चर्च संस्थेला रुचलेल्या दिसत नाहीत; किंबहुना खुपलेल्या आहेत.
या घोषणांचा लेखकाने ‘स्पॉराडिक स्क्विक्स’ (मधली कर्कश प्रकटने) असा उल्लेख करून ‘हे म्हणजे पुढे गोव्यात संभवणार्या ‘मणीपूर होलोकॉस्ट’ची सिद्धता आहे’, असे म्हटले आहे.
इ. ‘अल्पसंख्यांकांना शारीरिकदृष्ट्या संपवणे (म्हणजे ठार मारणे) ही ‘त्यांची’ (बहुसंख्यांकांची ?) तत्त्वप्रणाली आणि विचारसरणी आहे ’, असे लेखकाने म्हटले आहे.
ई. ‘सेक्युलर’ (निधर्मी) आणि ‘लिबरल’ (उदारमतवादी) हे दोन शब्द जणू शिवीसमान ठरवले जात आहेत.
उ. ‘ते’ (म्हणजे हिंदु गोरक्षक) पवित्र पशूच्या रक्षणाच्या निमित्ताने केवळ संशयावरून माणसांना ‘मॉब लिंचिंग’ (समूहाने मारहाण करणे) करून ठार मारत आहेत
ऊ. (ख्रिस्त्यांनो) तुमच्या आजोबा-पणजोबांनी वर्ष १९६७ मध्ये (ओपिनियन पोल – सार्वत्रिक चाचणी) गोवा वाचवला. आज डॉ. जॅक सिक्वेरा हयात नाहीत आणि गोंयकार (गोवेकर) संघटित नाहीत.
ए. तुमची चर्चेस पाडली जाण्याची शक्यता आहे; पाद्रींना मारहाण होण्याची शक्यता आहे आणि तुमचे कुटुंब… ध्यानात असू द्या.
ऐ. प्रायश्चित्त म्हणून, निदान गोव्यातून २ ‘सेक्युलर’ प्रतिनिधी तरी आपण निवडून देहलीला पाठवू शकलो पाहिजे !
ओ. ‘गोवन्स नीड टु युनायट.. ऑर दे विल पेरीश’ या शीर्षकाच्या (पान क्र. १०) डॉ. एफ्. ई. नोरोन्हा नामक लेखकाच्या लेखात या सगळ्या मुद्यांचा उल्लेख आहे.
२. चर्चने गोमंतकियांची अन् विशेषतः हिंदु समाजाची क्षमा मागावी !
‘रेनोव्हासाव’ हे चर्च संस्थेचे (आर्चडायोसिसचे) मुखपत्र आहे. हीच चर्चची हिंदूविरोधी आणि गोव्यातील समाजात फूट पाडणारी भूमिका असल्यास हिंदू रक्षा महाआघाडी या भूमिकेचा तीव्र विरोध आणि निंदा करते. ‘तशी ती नसल्यास चर्चने त्याविषयी योग्य खुलासा करावा आणि आपल्या अधिकृत मुखपत्रात ही भूमिका छापून आणल्याविषयी गोमंतकियांची अन् विशेषतः हिंदु समाजाची क्षमा मागावी’, अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडी करत आहे.
३. वेगवेगळ्या ४ उत्तरदायी पाद्य्रांनी केलेली राष्ट्र आणि हिंदु विरोधी कृत्ये
याचबरोबर ‘किमान ४ स्वतंत्र घटनांनी ४ वेगवेगळ्या उत्तरदायी पाद्य्रांनी केलेल्या राष्ट्र आणि हिंदु विरोधी कृत्यांविषयी चर्चने आतापर्यंत संशयास्पदरित्या गप्प बसणे सोडून त्याविषयी स्वतःची भूमिका आणि प्रतिक्रिया व्यक्त करावी’, अशीही मागणी हिंदू रक्षा महाआघाडी करत आहे. त्या घटना पुढीलप्रमाणे
अ. सांव जासिंतो बेटावर भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज फडकावण्यास स्थानिक पाद्रीचा प्रारंभाचा विरोध.
आ. गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनी चर्चमध्ये जमलेल्या लोकांसमोर पाद्री सुकुर मेंदिश यांनी केलेले पोर्तुगीजधार्जिणे देशद्रोही (व्हिडिओ प्रसारित झालेले) भाषण.
इ. ‘पोर्तुगीज गोव्यात आले, तेव्हा इथे हिंदूच नव्हते. पोर्तुगिजांनी मंदिरे उध्वस्त केली, ती हिंदूंची नव्हती, अन्य पंथियांची होती,’ असे ‘राशोल सेमिनारी’चे रेक्टर पाद्री व्हिक्टर फेर्राव यांनी लिहिलेला इतिहास विकृत करणारा शोधनिबंध.
पुन्हा याच पाद्रीने मांडलेली पोर्तुगीजधार्जिणी मते ‘पोर्तुगिजांनी गोव्यात काजू आणले. त्यातून गोंयकारांनी फेणी सिद्ध केली. त्यांनी मिरची बटाटे आणले. त्यापासून आम्ही विविध पाककला शोधून काढल्या. पोर्तुगिजांकडून मिळालेल्या विविध तत्त्वांपासून आम्ही गोंयकारांनी आपली ‘वेगळी’ अशी स्वतःची नवनिर्मिती केली, वेगळे अस्तित्व निर्माण केले. हा पोर्तुगिजांपासून मिळालेला वारसा सर्व गोमंतकियांनी सांभाळण्याची आवश्यकता आहे.’
ई. आता छत्रपती शिवरायांविषयी पाद्री बॉलमेक्स पेरेरांचे वादग्रस्त आणि सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेले एक भाषण.
४. …व्यापक जागरण मोहीम हाती घेणार !
या सर्व गोष्टींमध्ये हिंदूविरोध, चिथावणी आणि पोर्तुगीजधार्जिणेपणाचे समान सूत्र आहे. हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने भविष्यात फोफावणार्या या ‘डिनॅशनलायजेशन’च्या (खासगीकरणाच्या) चाललेल्या योजनाबद्ध प्रयत्नांविषयी व्यापक जागरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
– श्री. सुभाष भास्कर वेलिंगकर, राज्य निमंत्रक, हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा. (८.८.२०२३)